Monday, 27 November 2017

पार्सल



एक शरीर मातीच्या गोळ्यासारखं. त्यात ओतलेली ऊर्जा निरिच्छ.
आणि नुसतीच रिकामी भांडी मांडलेली आत्म्यात, हृदयात किंवा कुठंतरी
आणि आयुष्यातल्या ऋतूत भरणारी आणि रिकामी होणारी ती भांडी


अशी शरीरं वेगवान. फिरणारी आकाशातल्या चंद्र ताऱ्यांच्या सारखी
भावनांच्या इतर डोहांना भिडणारी.
त्या डोहांत बुचकळून निघणारी.
हे डोह म्हणजेही माणसंच. भावनांनि भरलेली.
कुठे स्वच्छ कुठे जहरी. कुठे निःस्वार्थ कुठे स्वार्थी


कधी आणि कुठे कुठल्या डोहातलं कुठल्या डोहात जाईल ह्याचा थांगपत्ता नाही
कधी स्वच्छ डोह होतात विषारी अन कधी विषारी डोह होऊन जातात अमृताचे


पण अंती सत्य एकच, माणूस फिरत राहतो भांड्यांचं अक्षय रितेपण घेऊन
एखाद्या गतिमान पुडक्यासारखा (पार्सलसारखा) नशिबाच्या आधीन
स्वतःच्या शरीरातल्या भावनांच्या डोहात
हतबलपणे स्वतःचं प्रतिबिंब शोधत


प्रमोद ( ०९ नोव्हेंबर २०१७ )

Tuesday, 19 September 2017

रात्र



मधेच कधीतरी उघडल्यावर डोळे, रात्र लटकली होती पंख्याला
माझ्याकडं पाहात विस्फुट डोळ्यांनी फिरत होती गोल गोल
माझ्या जागेपणाची चाहूल लागताच गेली निसटून लोटलेल्या दरवाजाच्या फटीतून
आणि हळूच डोकावून पाहात राहिली मिश्किल डोळ्यांनी


उठून बाहेर गेल्यावर बोलावत राहिली अखंड, अगम्य भाषेत रातकिड्यांच्या
दरवाजाची खिट्टी उघडल्यावर वाऱ्याच्या सोबत घुसून घरात
फासून गेली आर्द्र कोरड्या आत्म्याला


आकाशात विखुरलेले तिच्या स्वत्वाचे तुकडे, काही ठसठसणाऱ्या जखमा
आणि एक खिडकी तिच्या काळजात उघडणारी, गोलाकार


तिच्याकडं दुर्लक्ष करून तळ्याकाठी जाऊन बसल्यावर
हळूच कधीतरी आली पहाटवाऱ्यासोबत पायाला हुळहुळणाऱ्या लहरींसोबत


चमकत होते काही काजवे आजूबाजूला
रात्रीचं काही देणं चुकवायचं राहिल्यासारखे


रात्र मग मांडीवर येऊन झोपली सरळ
तिच्या केसांवरून हात फिरवत मी सुद्धा बसून राहिलो
अंधाराला रात्रीपासून वेगळं करत



प्रमोद (१९ सप्टेंबर २०१७)

Wednesday, 6 September 2017

बेंगळुरू, आमेले नोडोणा, होग बर्तीनी




रिअर व्हिऊ मिरर मध्ये पाहिल्यावर सारखं काहीतरी निखळून पडतंय असं वाटत होतं उगाच
असं वाटत होतं कि मातीतलं काहीतरी चाकांना लपेटून बरोबर यायचा प्रयत्न करतंय,
असफल होऊन पुन्हा मिसळतंय मातीत

एक अस्वस्थता छोट्याश्या लेकीला शाळेत सोडून यायचो तेव्हा जाणवायची तशी

अचानक रेल्वेच्या इंजिनाचा चालक असल्याची जाणीव
मागे सोन्याने लादलेले असंख्य डबे, प्रचंड मालमत्ता
कुठंतरी अपराधी जाणीव
ज्या मातीतून पृथक केलं सगळं ते तिच्या पासून दूर नेण्याची

असुदे जाईन इथून मी म्हंटलं तरी आकाशात अगणित हात,
निरोपाचे,गोंजारणारे वेशीपर्यंत सोबत.

जातांना accelerator वरचा पाय काढला एक क्षण
म्हणालो, "बेंगळुरू, आमेले नोडोणा, होग बर्तीनी" (बेंगलोरा, पुन्हा भेटू, जाऊन येतो)

गाडीच ती, जन्मच तिचा चालण्यासाठी
आणि रस्त्यावर होत्याच दिशादर्शक पाट्या.......


प्रमोद
६ सप्टेंबर २०१७

Thursday, 10 August 2017

लपाछपी

(पुढील ओळी चंद्रशेखर गोखल्यांकडून उधार )
मी आकाशाला गवसणी घालत असतांना जमिनीवर राहून माझ्यावर डोळे खिळवून असलेल्या माझ्या आईला समर्पित ही कविता . . . . . .


लपाछपी

ती शोधायची मला लहानपणी आणि मी लपून बसायचो
इकडे तिकडे शोधणाऱ्या तिला पाहून मस्त खिदळायचो


गंमत म्हणून ती सुद्धा शोधत राहायची मला मी दिसत असूनही


कधीतरी मोठ्ठा झालो मी, आता शोधावं लागणं हा स्वत्वाच्या मूल्यमापनाचा भाग बनून गेलाय माझ्या
कुणी शोधावं असं काही बनूच शकलो नाहीये, तासनतास लपून राहतो कोणी शोधेल ह्या आशेने


ती म्हणते असू दे राजा, नाही होता आलं वेगळं तरी बिघडलं कुठं, तू प्रयत्न केले त्याची ग्वाही द्यायला आहेच ना मी


आता खेळ उरला नाहीये मला शोधणं म्हणजे
आता तिची पावलं अडखळतात, डोळे अधू झालेत, सांधे करकरतात

जंगल झालंय गहन, दाट
आणि मी अट्टाहासानं लपून बसलोय कुणी मला शोधावं म्हणून …….


प्रमोद (२२ जानेवारी २०१५)

वळून आलो



भवतीच तुझ्या घुटमळलो, जरी खूप आधी निघालो
पोहोचलो वळणा आड फक्त, परतुनी वळून आलो


चोखाळला मार्ग मी स्वतंत्र, त्यागले जुनाट सारे
मनी ऑर्डर धाडताना गावी, वाटले पळून आलो


रिक्त केला घडा शेवटला, तृप्तता डोळ्यात त्यांच्या
खोल तळाशी प्रतिबिंब पाहतांना, आतुनी भरून आलो


पाकीटातुनी काढला निग्रहाने, वाटले वर्तमान स्वच्छ
कचऱ्यातुनी शोधला फोटो तुझा, डायरीत ठेऊन आलो


अविश्वास ठाम होता मनीचा, गेलो परी पोहोचलो नाही
ठळक नोंद दिनचर्येत पुन्हा, मंदिरात जाऊन आलो

प्रमोद ( ८ जानेवारी २०१६)

सौंदर्य




'ए तुला कुणी सांगितलंय का गं कुणी कि तू खूप सुंदर आहेस ते'

ती फणकाऱ्याने म्हणाली, ' मला हेच आवडत नाही तुम्हा मुलांचं,
अर्थाचा अनर्थ करता'


'पण मला एक कळत नाहीये, तुला तुझ्या सुंदर असण्याचा राग येतोय का 'मला' तू सुंदर वाटते आहेस ह्याचा? …. का?….ओह! … अगं नाही नाही … हि आत्ताची अनुभूती नाहीये, अगदी पहिल्यां भेटीतच वाटलं होतं मला तसं


पण माझ्या ह्या वाक्यामुळं तू बोलणं टाकणार असशील तर विसरून जा की तू सुंदर आहेस ते. . .
मी? . . . मी सुद्धा प्रयत्न करेन विसरण्याचा . . . पण काय होतं ना . . . एखादी गोष्ट इतकी ठळक असेल तर दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही ….


आता तुझे डोळे घे, तुझी जिवणी, तुझ्या शरीराची कांती, तुझ्या केसांच्या अगणित लहरी, जास्वंदाच्या पाकळीतून आर पार दिसत राहतं तसं तुझं नाजुकपण, तुझा बांधा, तुझ्या नुसत्या असण्यानं उठणाऱ्या लहरी, तू असलीस की नेमका मंदपणे वाहणारा वारा ह्या सगळ्याकडं मी दुर्लक्ष करेन सुद्धा. .


पण तुझ्या असण्यानं मला वेगळंच सौंदर्य जाणवायला लागतं स्वतःतच, तिकडं मात्रं दुर्लक्ष करता येत नाही
आजकाल असं स्वतःचं सौंदर्य जाणवण्याच्या जागाच हरवल्या आहेत….


हो पण माझ्या नगण्य सौंदर्याच्या पूर्ततेसाठी तुला तुझं सौंदर्य मान्य करायची काहीच गरज नाहीये
तू विसरून जातेस का सरळ मी जे काही म्हणालो ते? शब्दांनी काय होतं शेवटी, तुझं सौंदर्य राहणारच तसंच अमर्याद…


हो सरळ विसरूनच जा तू !


प्रमोद (४ सप्टेंबर २०१५)

निकष


सगळी आवराआवर करून झालीये
आवरून ठेवले आहेत नात्यांचे विस्तार

इकडच्या तिकडच्या account मधल्या रकमा गोळा करून
वाटून झाल्या आहेत

सगळे निरोप घेऊन झालेत,
एखादा गंभीर,
एखादा सगळ्यावर कोटी करून हसून हसून डोळ्याच्या कडा ओला करणारा

बरेच क्षण संपूच नयेत असे वाटणारे, तिच्यासोबत
तिनं माझ्या छातीवर डोकं ठेवलेला, एखादा तिच्या केसात रेंगाळणारा,
एखादा स्तब्ध, अबोल. भैरवीच्या स्वरांसारखा वर्तुळाकार, स्वतःतच गुंतलेला
सगळे निरोप घेऊन झालेत… . . . . .


कोण?
अरे, ये...ये ना प्रेषिता, ये ये ......
काय? दोन? फक्त दोन?


सगळे निरोप घेऊन झाले होते
पण पुन्हा ……
पुन्हा मोठ्ठा पसारा मांडून बसलो आहे
अचानक जाणवतंय स्वतःचं निर्मोहीपणाचं ढोंग

निर्णयापेक्षा त्यामागचे निकष ठरवणंच जास्त अवघड असतं
आता गोळा करत आणलेलं सगळं पुन्हा पसरत चाललंय
सगळ्या सुगंधी कुप्या, मखमली कापडातल्या पोथ्या,
बोहारणीला द्यायचे कपडे, प्रेमपत्रं, प्रशस्तीपत्रकं
फेकून द्यायच्या वस्तूंचा ढीग, अगदी स्मशानातली थडगी सुद्धा

सगळीच उलथापालथ,
उगाच काही तरी सांगितलं प्रेषितानं अगदी निघतांना
महाप्रवासाला निघण्या आधी म्हणे कुठल्याही दोन, फक्तं दोन वस्तू घेता येतील म्हणून

नेमक्या कुठल्या दोन वस्तू घ्यायच्या हे ठरवणं वरकरणी किती सोप्पं वाटतं,
निर्णयापेक्षा त्यामागचे निकष ठरवणंच जास्त अवघड असतं!

प्रमोद (१५ सप्टेंबर २०१५)

तू गेल्यानंतर




तू गेल्यानंतर मी नुसताच बसून राहातो
झिरपू देतो तुला माझ्यात संपूर्ण


तू गेल्यानंतर एक शांत शांत मी असतो माझ्यासोबत
संध्याकाळच्या गहिऱ्या आकाशात, आणि एक पक्षी


तू गेल्यानंतर भरतीनंतरचा समुद्र होऊन जातो मी
शांतपणे ओहोटीची वाट पाहणारा, धीरगंभीर


तू गेल्यानंतर काढत राहतो हृदयावरची तलम पापुद्र
तुझे इतःस्ततः विखुरलेले स्पर्श जपून ठेवायला, रेशमी


तू गेल्यानंतर दरवळत राहतात तुझे गंध बराचवेळ
धूसर होतात तोवर आकाशात चमकत असतात तुझ्या शरीराचे परावर्त
ते वेचून घेतो


तू नेहमी सोबत निघायचा हट्ट करतेस,
तू जातेस एवढं ऐश्वर्य सोडून एखाद्या राजकुमारी सारखी
आणि माझ्यातला मी उरतो मागं, व्यवहारी,


जौहरी असणं त्रासदायक आहे तुझ्यासोबत


प्रमोद (१४ जानेवारी २०१६)

देव, दर्शन आणि ती




तुझे चौसोपी घर, समोर देव येऊन वसला
काय म्हणावं ह्याला, हा योगायोग कसला

कुणी म्हणालं जागृत आहे देवस्थान
तुझ्या विचारात, बोनस जाहीर करून टाकला

आईनं न सांगताच जातो देवळात आता
बऱ्याचदा दर्शन झाल्यावर, विश्वास बसला

बरंय तू होतीस आज मंदिरातच
बोलायचा होता नवस, आज अनायासे देव भेटला

तुझा गुलाब, मोगरा, रेंगाळलेला रातराणीच बहर
तू न्हवतिस आज, देवळासमोरचा भिकारी दिसला

घाईत असतांना मी धरतो सरळ दुसरा रस्ता
तुझ्या दाराशी घुटमळतो तो short cut कसला


प्रमोद (५ फेब्रुवारी २०१६)

शेवट



झोपच नाही लागली नीट, सारखे दरवाज्या बाहेर पदरव
घेता नाही आलं पांघरूण, बाहेरच्या बोचऱ्या थंडीच्या विचारानं

सकाळच्या घाईत विसरलो, पण होती दरवाज्यासमोर संयतपणे वाट पाहणारी
डोळ्यांनीच आर्जवं केली तिला केविलवाणी अन वेगात निघून गेलो, हतबद्ध

आरश्यात पाहात राहिलो तिला, कुठेही राग नाही ना विषाद चेहऱ्यावर
लेकीला सोडलं शाळेत, गेटबाहेर असेलच असा विश्वास होता. होतीच

गाडी चालू केली, थांबलो एक क्षण, डोळ्यांनीच इशारा केला
मागच्या रिकाम्या सीटवर येऊन बसली काहीच न घडल्यासारखं

पोहोचलो एकांतवासात, ती सुद्धा शेजारी. . . .
तिच्याशी नजरानजर टाळत म्हणालो, पण जाणवत होते तिचे भाववेडे डोळे एकटक

'का वागते आहेस अशी? सोड ना माझा पाठलाग'
'हे बघ, मला सुद्धा तू आवडतेसच, पण हे शक्य नाहीये'

ती नुसती डोळ्यात पाहात राहिली माझ्या, उठून निघाल्यावर पुन्हा मागोमाग
चिडून वळलो, भडाभडा बोललो, सांगितलं आवडेनाशी झालीयेस तू,
त्रास होतोय तुझा, सारखी साली कटकट,
एक सूक्ष्मशी वेदना आहेस तू, अविरत छळणारी


म्हणालो विसरून जा ते मोरपिशी क्षण,
इंद्रधनुचे रंग तुझ्या पदरावर भरलेले, मिळून दोघांनी
ईश्वराच्या अंतःकरणात मारलेले फेरफटके,
जळणाऱ्या प्रेतासोबत उडणाऱ्या ठिणग्यांवर बसून अनुभवलेले अनिर्बंध

विसरून जा माझ्या शरीराचे स्पर्श,
मी सुद्धा हुसकावून लावेन तुझे अगणित गंध
शोध कुणी दुसरा देह, आत्मा, काळीज, मन
सापडेल, तू आहेसच तशी आकर्षक, लाघवी

निघालो. . . ती राहिली मागे. . . उध्वस्थ, भग्न. . . .
मी सुद्धा . . . . कोसळलो होतो आत कुठेतरी . .
… …
…. …


घरी गेल्यावर पुढच्या रिकाम्या पानावर आजची तारीख घातली . . .
आणि मग उलटत राहिलो पुढची रिकामी पाने . . . कवितेच्या वहीतली


प्रमोद (१२ फेब्रुवारी २०१६)

Missed call!



'No No, destiny वगैरे शब्द एखाद्या financial proposal मध्ये वापरू नये शक्यतो'
'अरे, reject होणं, हे प्रत्येक missed callच्या जन्माच्या वेळीच ठरलेलं असतं'
'destined नाही devised , It is devised for a purpose, devised हा शब्द योग्य आहे'

'depressed missed calls चं rehabilitation center ही fantastic idea आहे'
'भटकणाऱ्या सगळ्या missed callsना एकत्र करून, meditation घेऊ'
'missed callsच्या आत्म हत्येचे statistics मिळतील google वर'
'त्यांना जगण्याची नवीन उमेद देऊ, it will sell for sure'

missed callच्या depression मागचे मुद्दे ना? हो घे लिहून घे'
'missed call नकोच असतात service providerना,
नुसती band width खातात, आणि revenue शुन्य'

'हो ना, आणि कुठल्याच बिलात दिसत नाहीत ते, त्यांचं अस्तित्व तसं नाहीच'
'आणि अजून एक, message कसे save करून ठेवता येतात'
'actually it's funny, मला आलेला पहिला I Love you! चा मेसेज मी अनेक वर्षं जपून ठेवला होता'
'आणि missed call चं स्वतःचं असं काही characterच नसतं ना,
म्हणजे inspirational नाही, depressing नाही, dirty नाही'
जसा भोवताल तसे अर्थ नाहीतर missed call तसा निरर्थकच'
'तू proposal लिही तरी, मी funding साठी lobby उभी करतो'

'hmm. . . . हो हो काही करोड तरी नक्कीच. . . . '
'financials work out करू संध्याकाळी भेटून'

'एक मिनीट hold कर, ……. अगं निघतो मी, बाय'
          'संध्याकाळी जायचंय ना?'
'हो जाऊया ना, तू ऑफीस झाल्यावर ये मग मिळूनच जाऊ'
          'कुठं भेटू?'
'माझ्या ऑफीस जवळ ते अनाथाश्रम आहे ना तिथेच ये'
          'नको बाबा, तिथलं वातावरण depressing असतं खूप'
'तुला थोडीच राहायचं आहे तिथं. मग कुठं भेटायचं?'
          'त्याच्याच पुढं ते नवीन दुकान निघालंय ना तिथं भेटू'
'ओके, done ……… तिथं पोहोचलीस की missed call दे!
          'पण तू लक्ष ठेव मोबाईलकडं, मी missed call देऊन वाट बघत बसेन'
'Oh Dear, fantastic point, thanks!' 'hello, ऐकलंस का रे? missed call can be missed! महत्वाचा मुद्दा आहे. by the way आमचं खाजगी बोलणं ऐकतोस होय. . . हा हा हा …. भेट मग बघतो तुझ्याकडे. . . .एक मिनीट'...... 'लक्ष ठेवीन गं mobile कडं'
'काय?
'काही नाही, मी लक्ष ठेवतो म्हणलं मोबाईल कडं, पण जरा मोठ्ठा missed call दे'
'नको तिथं कोकणस्थीपणा दाखवू नकोस'
'I generally never miss a missed call! bye!'
'Bye'

'हं …. बोल रे, yes

'yes, the whole point is empathy sells'
'संवेदनेचे आर्थिक फायदे भरपूर आहेत'
'proposal पाठवायची deadline कधी आहे……'
'OK . . … . . . '
'चल बोलू नंतर, I need to drive'
'See you in the evening! Bye'


प्रमोद (२ नोव्हेंबर २०१५)

आई



बहरतातच शेकडो फुलं
जर जमीन खोदली कुणी
धरेचं हृदय हिरवंगार
काळ्या मातीच्या खोल आत

उगवली रंगीबेरंगी फुलं
पोसली दुजाभाव न दाखवता
आता जमलेत सारे
रंगांचे गालिचे झुंबडींनं बघायला

त्यातलं नटखट पाऊल
आईला न जुमानता शिरलं
अथांग पसरलेल्या
फुलांच्या लाटात अनिर्बंध





भळभळत्या जखमांनी
त्या नाजूक देहाला कवटाळून
चिडलीये निर्मात्यावर
दिली नाही वाचा म्हणून

किंचाळत राहिली
"फुलांच्या खाली भू सुरुंग पेरलेत त्यांनी……."






अवघड होतं ठरवणं
नाकारायचं कुणाला? का?
निर्धास्त विसावलेल्या बीजाला?
का त्या नंतरच्या पावलांना?

बीज बिलगल्यावर
अनिर्बंध फुटला पान्हा
स्वीकारलं प्राक्तन
रुजवताना फुलाच्या बीजाला




जळून गेलंय आईपण
करपलेल्या देहांच्या सोबत
ती म्हणत राहीली
भू सुरुंग पेरणाऱ्याना

पुढच्या जन्मी
आई म्हणून जन्माला या
पुढच्या जन्मी
आई म्हणून जन्माला या


प्रमोद ( २४ मार्च २०१६)

रेफ्युजी



नाही, हा सुर्य तोच नाहीये, माती सुद्धा
घाम नाही, अश्रू नाही, विचार नाही. मी नाही.

तिथंच आहे मी, त्याच घरात, देशात, मातीत
पण तरी हा सुर्य तोच नाहीये

माझ्यातला मी तोच नाहीये

माझ्या देहात भरून उरलोय मी नुस्ताच
संमोहित झाल्यासारखा उलट सुलट फिरत असतो.… कफल्लक भिकाऱ्यासारखा
माझ्यावर मालकी असलेला कोणीतरी वेगळाच आहे. तो ….

तो . . . कवितेच्या वह्या फाडून शेकोटी करून बसतो
त्यातून अर्धवट जळलेल्या एखाद्या कवितेचा तुकडा मिळाला की…….
की ……
पुन्हा भिरकावून देतो आगीत


मी प्रेमानं जोपासलेल्या संवेदना किंचाळायला लागल्या की
तो . . . त्यांना मांडीवर झोपवतो आणि हलकेच सुरा फिरवतो मानेवरून…. धारदार


कुठंतरी एक मोठ्ठा खड्डा खणलाय त्यानं. . . संवेदनांची प्रेतं, कवितांचा कोळसा,
स्वरांचे सांगाडे, त्वचेतून सोलवटून काढलेले शहारे, सगळं तिथं फेकून देतो


मी  आरश्यात पाहिल्यावर नुसताच पारा दिसत राहतो… नितळ
किती दिवस झालेत स्वतःला पाहून. . . . पुरता विस्कटून गेलोय, किंवा तसं वाटतंय


वाटतंय उठाव करावा. . . . सोडवावं स्वतःला त्याच्या तावडीतून
अवसान आणून गेलो त्याच्या जवळ …. की तो तुच्छतेनं बघतो माझ्याकडं


करड्या भेदक आवाजात म्हणतो,
'तू फक्त एक रेफ्युजी आहेस … रेफ्युजी!'


प्रमोद (२२ एप्रिल, २०१६)

अश्रू



क्षणार्धात धावून येतो
कधी उगवतो अश्रू ?

हसता हसता उन्मळतो
कुठल्या देठावरुन अश्रू ?

गेल्यावर तू, तोही जातो
चिडतो कुणावर अश्रू?
अखंड पाझर, अथक झरतो
कुठं विरतो अश्रू ?

फोडले जरी डोळे
संवेदनांच्या काट्यांनी
ठिबकत राहतं रक्तं वेगळं
वेगळाच वाहतो अश्रू

वेदनांच्या आभाळाला निरखत बसतो
फाटका एखादा आत्ममग्न
फकीर वेडा अश्रू

दुःखी जन्मतो का सांत्वनी हा?
तुझा असतो का माझा
का नसतो कधी कुणाचा अश्रू


प्रमोद (१९ मे २०१६)

उगम, प्रवास आणि अंतर ( एक संवाद...... कुणाशीतरी)



तो/ ते

उगम आठवतोय का कुठं होता ते?
सोडले होते का काही पुरावे?

पुरावा, एखादा, कालातीत, जो शोधता येईल?
शोधल्यावर छापता येईल?

एखादी भली मोट्ठी शिळा?
एखादा हस्तिदंत?


मी 

नाही हो, स्वतःचं रक्तं सांडलं होतं
ध्येयपूर्तीशिवाय थांबणार नाही अशी शपथ घेतांना.

खरंय तुमचं, रक्त मातीत मिसळलं की त्याचा मागमूस उरत नाही.
हो हो वेडाच आहे मी.
हो पण एक झाड काय लावलं होतं उगमापाशी.
अं?.... खरंय, झाडं काय अशीही उगवतातच


अहो महत्व पोहोचण्याचं आहे
मग प्रवास किती केला ह्याचा पुरावा कशाला हवा?


काय? पुरावा नसेल तर माझी तत्त्वं, कविता, गाणी, शिल्पं आणि त्या मागचे विचार
सगळेच बेवारस होऊन जातील?
अहो .... एखादी चांगली व्यक्ती भेटली कि आपण आई बापाचं नाव नाही विचारत,
म्हणतो फक्त संस्कार चांगले केले आहेत हो! ..... अगदी तसंच


पुरावे नसले तरी ती सगळी तत्त्वं, कविता, गाणी आणि तत्सम सर्व
चांगल्या प्रतीचं असेल मागं उरेलच. नावा शिवाय सुद्धा. मग नावाचं काय?
अहो प्रवास महत्वाचा आणि त्या प्रवासाची मीमांसा, ती पण त्या प्रवाश्यासाठी


अहो नावाचं काय घेऊन बसलात? बसलाय कधी नदी काठी?
नदीच्या पात्रात कधी एखादं छानसं फूल वाहून येतं तर कधी बेढब, निस्तेज बेवारस प्रेतसुद्धा


पाहणारा निरिच्छ असला तर वाहून जाऊ देतो सगळं
अन एखादा ते फूल उचलून माळतो कोणाच्या केसात
प्रेताला अग्नी देतो, ढाळतो काही अश्रू अज्ञात दुःखासाठी


हि तत्त्वं, कविता, गाणी, शिल्पं आणि तत्सम सर्व असंच वाहत राहील कालौघात
कुठं नावाचं घेऊन बसलात आणि कुठं उगमाच्यापाशी ठेवलेल्या पुराव्याचं
प्रत्येक ठिकाणी ठेवायला शिळा घेऊन फिरलो तर किती ओझं होईल खांद्यावर


अहो प्रवास महत्वाचा आणि त्या प्रवासाची मीमांसा, ती पण त्या प्रवाश्यासाठी

काय? विषयांतर होतंय?
नाहीये, पुरावा नाहीये उगमा पाशी पुरलेला!
झाडाचं आता जंगल झालंय आणि रक्ताची फुलं.
चालतंय का बघा!


प्रमोद
२९ सप्टेंबर २०१६

मस्जिदीत अजान झाल्यावर



मस्जिदीत अजान झाल्यावर थोड्यावेळाने मी मंदीर उघडतो
मंदिरात येतात तसे तिथंही काही खरे भक्त येत असतीलच ना
उगाच देवाची पंचाईत नको, त्याचीही नको घाई गडबड सकाळच्या प्रहरी
म्हणून मी मस्जिदीत अजान झाल्यावर थोड्यावेळाने मंदीर उघडतो


प्रमोद (१ ऑकटोबर २०१६)

deadline संपते तेव्हा



आज थोडा राक्षसीच आहे मी सकाळ पासून
deadline दिसत असतांना अचानक पुढ्यात येऊन पडलेल्या तान्ह्या कवितेला
उचललं पायांना धरून आणि शेजारीच ठेवलेल्या पुस्तकांच्या ढिगावर आपटली

सगळीकडे रक्ताचा सडा, कवितेचं रक्तं लाल नसतं म्हणे माणसांसारखं
पण कवीकडे असते, एखाद्या शापित यक्षा सारखी विशेष दृष्टी
कवितेचं रक्तं चमकत राहतं neon दिव्यांसारखं

शेजारीच पडलेला शोध लेखाचा खर्डा. एकदा पाहिलं त्यातल्या मुद्द्यांची नोंद केली आहे ना ते
मग त्यातला एक एक कागद फाडून, सगळं टेबल पुसून काढलं
laptop वर पडलेले कवितेच्या रक्ताचे डाग पुसताना,
उघड्या word document मध्ये काहीतरी आपोआप टाईप केलं गेलं

उगाच पाहात राहिलो काही अर्थ लागतोय का, वाटलं एखादं भाकित, एखादा शाप, तळतळाट
उगाच आजची deadline असलेला लेख save as केला, वेगळ्या नावानं

रक्तानं डागाळलेले पेपर कचरा पेटीत टाकून दिले
आणि अगदी काहीच न झाल्यासारखा थंडपणे काम करत राहिलो

कधी कधी खूप राक्षसी नसतो तेव्हा कवितेला अलगद उचलून ठेऊन देतो बाहेर

कानावर headphone लाऊन जोरात एखादं गाणं लाऊन टाकतो
तान्ह्या कवितेचे टाहो ऐकू येऊ नयेत म्हणून
काही क्षणांनी बाहेर जाऊन बघतो
काही नामो निशाण नसतो कवितेचा,
आकाशात एखादी घार घिरट्या घालणारी
उगाच एक क्षण बघतो तिच्याकडं

deadline संपते तेव्हा, लेख upload केला कि एकदा confirm करतो,
डोळे गरम झालेले असतात, दोन्ही हातांच्या तळव्यांनी डोळे झाकून घेतो
आणि मग रडत सुटतो, आईच्या कुशीत शिरल्यासारखा, ओक्साबोक्शी
हाताला राहिलेले रक्ताचे डाग खरडून खरडून काढत राहतो,
पण त्याचे डाग अगदी आत्म्यापर्यंत उतरलेले असतात,
मग सोडून देतो प्रयत्न

deadline संपते तेव्हा त्याच कवितांचे आत्मे फेर धरून नाचतात. . .
आता येत राहतील त्या कवितांचे चित्कार, तिच्या कोवळ्या पायाच्या स्पर्शाची भूतं
……. deadline संपल्यावर

आणि मी शुन्यात बघत बसतो
मनात देवाला एकच विचारत राहातो
असे किती खून लिहिले आहेस माझ्या नशिबात? …….
किती? …….


प्रमोद (वजा एक खून )
२७ ऑक्टोबर २०१५

Option

Even though there is an option to 'Hibernate',
I prefer 'Shut down'

There would be many windows open
A window would have path breaking research in it,
a beautiful poem in another
my Facebook, some blog.
My own unfinished paper,
and somewhere a job application, half filled!

I patiently close each window, irrespective of urgency.....

Each morning should be like a clean slate.
Yesterday must not ruin today's fate.

If you connect yesterday with today,
life becomes a long unending journey.
One invariably loses, those unplanned breaks on winding road,
those glittery moments of nothingness at the very moment of fresh start

and,
if you wish to remember where you left last,
each moment has a 'history', recorded somewhere, unknowingly.

Even though there is an option to 'Hibernate',
I prefer 'Shut down'

Pramod
Translated from my original Marathi poem 'पर्याय'

Quenching



'किती दिवसांनी अश्या भेटलो आहोत नाही?' ती म्हणाली
गरमागरम पोहे आणि चहा बरोबर भरपूर चहाड्या केल्या

दोघी सोफ्यावर पाय पसरून पहुडून राहिलो, विचारात गुंगलेल्या
किती वेळ कुणीच काहीच बोललं नाही.....

तुला metallurgy आठवतंय का गं?'
'काय? हे काय अचानक?
'आठवतंय का?'
'हो, माने सर होते ना? छान शिकवायचे'
त्यात quenching ची प्रक्रिया होती बघ, आठवतीये?
'हो, surface treatment ची प्रक्रिया ना?
धातू तापवायचा, अगदी तांबूस लाल होई पर्यंत'
'हं, आणि मग एकदम थंड liquid मधे टाकून द्यायचा'
म्हणजे त्या धातूचा पृष्ठभाग टणक होऊन जातो
....
.....

....
सूर्य उगवल्यापासून धावत सुटावं लागतं
मुलांचे डबे, त्यांच्या शाळेच्या वेळा,
भाजीत विसरलेलं मीठ,
नवऱ्याची महत्वाची मीटिंग
ऑफिसमधे मॅनेजरचे नखरे,
बस, लोकल मधल्या ओंगळवाण्या नजरा
दुकानातल्या शेळपट भाज्या
अगदी झोपतांना आठवलेली इस्त्री

सगळं झाल्यावर पाठ टेकली कि ......
त्या थंड liquid मधे अचानक कुणी तरी टाकून दिल्यासारखं वाटतं
सगळी गात्रं बोथट अगदी त्या quench केलेल्या धातूच्या गोळ्यासारख्या
......
......
......

तो येतो जवळ नाजूक स्पर्श लेऊन,
पण भेदू शकत नाही मनाची कठोरता
तो ही थकलेला झोपून जातो काही क्षण वाट पाहून
मग कधीतरी त्या quench केलेल्या धातूच्या गोळ्यातला तलम आत्मा
त्याला मिठी मारून प्रयत्न करत राहतो
मनावर, आत्म्यावर, संवेदनांवर चढलेली कठोर पुटं झटकून टाकायचा
त्याला मिठी मारून..... आणि तो पोहोचलेला अज्ञातात


मी नुसती ऐकत राहिले ..... आणि ती नुसतीच गप्प


प्रमोद (२२ नोव्हेंबर २०१६)

पाऊस



तिफन घेऊन खांद्यावर त्यो भल्या पहाटचंच निघाला आकाश नांगराया
समदं आकाश नांगरलं त्यांच्या खिल्लारी बैलजोडीनं, उभं आडवं
पाण्याचा येक येक थेंब जमा केलेला पावसाचा, इहिरीतला, डोळ्यातला, घामाचा
एक हाताच्या अंतरावर टोबला आन त्यावर माती लावली चांगली इतभर
पावसाची इवली इवली रोपं निघाली आकाशाच्या पोटातून
पाहता पाहता मोट्टी झाली, पसरली आभाळभर
लागली त्यांना मोठ्या मोठ्या थेंबांची फळं
शेताच्या मधोमध हुभारून मंग त्यानं लगोरीनं येकच दगड हाणला, अन टप, टप, टप, टप, टप, टप.......



'आज्ज्या, आज्ज्या, आज नक्कीच पाऊस पडणार रं'
तांबडं फुटायच्या वेळी त्यो आज्याला उठवत म्हणाला.
आज्ज्या म्हणाला,
'व्हय का? सपान पडलं वाटतं तुला...... पडणार. आज पडल पाऊस. पहाटं पडल्यालं सपान खरं हुतं म्हणत्यात'
तो पडून राहिला आज्ज्याच्या छातीला बिलगून..... त्यानं पेरलेल्या थेंबांची झाडं व्हायची वाट बघत,
निळ्याशार आकाशात सूर्य उगवत होता.



प्रमोद (३ मे २०१७)

कधी.......



कधी बसला आहेस का निश्चल, भावनांनी ओथंबलेला तरी कोरडा? शून्यात बघत.
दगडाला सुद्धा लाजवेल असा थिजलेला, तासनतास

रडला आहेस का कधी कुठल्याश्या बेवारशी अनामी दुःखासाठी. अविरत बरसणाऱ्या पावसासारखा
पुनःपुन्हा येणाऱ्या हुंदक्यांना गोंजारत, तान्ह्या बाळासारखं

चिडला आहेस का स्वतःवर, देवावर चिडल्यासारखा
आरश्यासमोर उभारून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःच्याच निर्लज्जपणाचे पाढे वाचत?

कधी पुरलं आहेस का स्वतःला उबदार पृथ्वीत खोल. स्वतःवर माती लोटून देत.
भयावह काळोख्या अंधारात आत्मज्योत तेववून

कधी पोहोचला आहेस का स्वतःचाच माग काढत आईच्या उदरात?
पोटातल्या पाण्यात तरंगत अनुभवलं आहे का जळणाऱ्या प्रेतातून निसटलेल्या आत्म्याचं हलकंपण

कधी झोकून दिलं आहेस का, महाकाय उंच कड्याच्या टोकावरून स्वतःला
कानात फडफडणाऱ्या वाऱ्यासोबत डोळ्यात भरून घेतलेला अंधार.......

शेवटच्या आघाताची वाट पाहात केलेला शेवटचा प्रवास
आणि.........................................................................
...................................................................................... धाड




प्रमोद ( १२ मे २०१७ )

भेट



कुठे जातांना, रस्त्यात कविता सुचली कि मी अस्वस्थ व्हायचो
जीवाच्या आकांताने सायकल हाकत पोहोचायचो

मनातल्या मनात उजळणी करत राहायचो कडव्यांची
शक्य झालं तर अरसिक, निर्जीव वस्तूंच्या प्रवाही गर्दीच्या मधोमध
पाकिटातल्या एखाद्या चिठोऱ्यावर लिहून काढायचो
मोबाईल मधे रेकॉर्ड करायचो

आताशा, अशी कविता मी लिहितो मनातल्या मनात
चेहेरा उजळून जातो समईने उजळलेल्या देव्हाऱ्यासारखा
रेंगाळतो तिच्या अवती भवती,
न्याहाळतो तिला काही क्षण आणि मग ….

मग मी जाऊ देतो तिला. . . .
देतो निरोप एखादा आप्तेष्ठ कायमचा सोडून चालल्या सारखा
जाते कविता हळू हळू निसटून हृदयातून,
एखादी तलम ओढणी निसटावी तशी

सरते शेवटी उरतात काही शब्द, इथं तिथं, चंदनी गंधासारखे

जाताना म्हणतो तिला, माझी असशील तर भेटशीलच पुन्हा

दिवस चालू राहातो पुढं तसाच, शांतपणे
कवितावहीच्या कोऱ्या राहिलेल्या पानासारखा. निर्मळ


प्रमोद (७ मे २०१६)

Wednesday, 9 August 2017

ती आणि कविता



च्यायला उगाच खरं बोलायला गेलो, सांगायला हवं होतं वाढवून चढवून काहीतरी
पण मी गांधीजींचा भक्त, सांगून टाकलं, मला नाही माहीत कुठून येतात कविता ते
कधी पहाटेच्या वाऱ्यासारख्या येतात तर कधी युद्धातल्या बॉम्बसारख्या कोसळतात डोक्यात
पण एवढं नक्की रोज येणार्‍या पेपर किंवा दुधवाल्यासारख्या भरवशाच्या नाहीत, अगदी कामवाली इतक्याही नाहीत

त्या नंतर तीचं रोजचं भेटणं कमी होत गेलं,

एकदा भेटली अचानक खिशात पेन नसताना भेटलेल्या कवितेसारखी.
थांबवता सुद्धा आलं नाही आणि जाऊही देता नाही आलं, जितका पकडायचा प्रयत्न तितकीच अलगद गेली निघून

म्हणाली पैशाचा स्त्रोत ज्यावर अवलंबून आहे त्या कवितेचा स्त्रोत जर ठाऊक नसेल तर कशाच्या भरवशावर राहू मी
मी काही बोललो नाही नुसताच शांत राहिलो, कविता सुचत असल्यासारखा,

ती निघून गेली थोड्यावेळ वाट पाहून

आता नाही भेटत आम्ही, माझ्या फेसबुकवर टाकलेल्या कवितांना ‘लाईक’ करते ती
करणार आहे मी तिला ‘अन्फ्रेंड’, वाट बघतोय फक्त . .शंभराव्व्या कवितेला ‘लाईक’ करायची .

‘साल्या नव्व्याणऊ कविता सुचतात आणि शंभराव्वीच कशी सुचत नाही, उगाच भावनिक होऊ नकोस.
मित्र रागावून म्हणाला.
मी म्हणालो, ‘खरंच मला नाही माहीत कुठून सुचतात मला कविता ते!’


प्रमोद (भिकनगाव, जुलै १५, २०१४)

पाहुणी 



दूर कुठल्या देशात, कसं सगळं साजिरं गोजिरं
लोकं गोजिरी, रस्ते रेखीव, स्वच्छ तलाव

तिथल्या झाडाची पानंही पडतात नक्षी काम केल्या सारखी
सगळीकडे एक व्यवस्था, नेटके पणा,

कुणी शिकवलं असेल इथल्या निसर्गाला, कुत्र्या मांजरांना, मेघांना, वाऱ्याला, ताऱ्यांना?
का देवदत्तच असेल असं सगळं?

असा काहीसा विचार करत मी शिरलो हॉटेलच्या रूम मध्ये, बसलो पलंगावर विचाराधीन
अन काहीसं ऐकू आलं कानाला, काहीसं परिचित, शोध घेत फिरत राहिलो रूमभर

शोध सुरु केला अन सगळी शांतता. लहानपणी कुठला तरी जमा केलेला शिंपला हरवल्यावर वाटायचं तसंच काहीसं वाटलं
पुन्हा तो आवाज, पटकन धावलो आवाजाच्या दिशेने, बाथरूम मधल्या आरशाच्या काचेवर सापडली ती…

ती 'माशी', अगदी माझ्या देशात असते तशीच, मी कुतूहलाने जवळ गेलो तिच्या, न्याहाळलं
आणि एकदम खुश झालो, कोणीतरी स्वकीय भेटल्याचा आनंद झाला

ती उडाली छान पैकी अस्ताव्यस्त उडत राहिली, कुठलाही व्यवस्थितपणा नाही, कुठलेही नियम नाहीत

मी एकदम घाबरलो, विचार आला मनात, 'कदाचित माझ्या सामानातून तर नाही ना आलेली इथे?'

पुन्हा आरश्यावर बसल्यावर म्हणालो तिला, बघ माझ्या देशातून आली असलीस तरी इथले नियम वेगळे असतात बाई
इथे उगाच भावनाशील होऊन काही करायचं नाही. कोरडं राहायचं.
जमत असेल तर बघ नाहीतर तू माझ्या सामानात काही जड नाहीस.

परवा फ्लाईट आहे माझी तो पर्यंत थोडी जपून राहा, हाउस कीपिंग वाले येतील तेव्हा माझ्या सामानात गप्प दडून राहा

आणि जर तू इथलीच असशील आणि कंटाळा आला असेल तुला एवढ्या व्यवस्थेचा, थोडी अव्यवस्थित वागायची हुक्की आली म्हणून आली असशील तर,
तर राहा बापडी. शेवटी काय सगळीकडं सगळं चांगलं नसतंच.

पण हो आधी सांगितल्याप्रमाणे, मी परवापर्यंत आहे, भेटत राहा, तेवढंच थोडं बरं वाटतं.


प्रमोद (४ डिसेंबर २०१४)

चंद्र आणि ती



गच्चीतल्या एका कोपऱ्यात चहा भरलेला थर्मास घेऊन बसायचो मी

रात्रभर लिहायचो कविता, आर्जवं तिच्यासाठी.
चंद्राच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर

रात्रभर छोटे तुकडे करून चंद्र पुरवायचो
अन पहाटे कधीतरी चंद्र संपून जायचा

पहाटवारा माझ्या घराकडून तिच्या घराकडं वाहातो ते बरंय

भेटल्यावर ती सांगायची ही कविता छान होती, ती मस्त आणि बाकीच्या . . .
म्हणायची बाकीच्या कविता हरवतात रोज-रोज, त्यापेक्षा तू ई-मेल का करत नाहीस?

'ज्या पोहोचतात त्याच खऱ्या कविता बाकी … .. . . . अश्याच'
मी हसायचो, 'चल काळी शाई संपलीये, आणि आज पौर्णिमा!'



प्रमोद (ऑक्टोबर ६, २०१४)

समज 



समजलंय…, असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा मला समजत असतं की हा सगळा असमंजसपणा आहे
थोड्या काळाने समजांच्या रेषा धूसर होऊन समजलेलं सगळं समजांच्या पुढे निघून जाईल कुठंतरी

सगळ्या समजा वर्तमानातल्या. त्यांना भविष्य नाही ना भूतकाळ, असा माझा एक समज आहे
कारण अंतीम सत्य हे नेहमी कालातीत असतं, पण ते समजत असलं तरी उमजत नाहीच

समजा आणि हे सगळे समज उमजलेच तर बोलायला काही उरेल का?
कारण हे सुद्धा समजेल कि प्रत्येकाला स्वतःच शोधाव्या लागतात स्वतःच्या समजुती

मग सगळी प्रवचनं, सल्ले, सिद्धांत, वादविवाद, उपदेश सगळी बाष्कळ चर्चा होऊन उरेल
बंद होतील अनेक व्यवसाय, अनेक प्रार्थना स्थळं, का सगळे संवादच (आणि मग वाद) संपून जातील?

लोक करतील प्रयोग स्वतःचे. कुणी शांत होईल, कुणी खून करेल, कुणी बलात्कार
आणि ज्यांच्यावर हे प्रयोग होत राहतील त्यांच्या समजांचं काय ?

ह्याचा अर्थ असा का की प्रत्येकाने वाटले पाहिजेत आपले समज?
ह्या आशेने कि समजा समजलेच कुणाला तर त्यांचे कष्ट, विवंचना कमी होतील
लिहून काढावी का गीता किंवा तुकाराम गाथा किंवा कुणा एकाची भ्रमणगाथा?
का कुठल्या निर्मनुष्य जंगलात जाऊन ध्यानस्थ बसावं?

मला सगळं समजतंय असा गैरसमज नाहीये माझा, 
पण विचार करूच नये असं समजावलं मनाला तरी त्याला समजत नाही त्याचं काय?
आणि समजा ऐकलंच मनानं, तर हे समज विरून जातील? 
का असतील कुठंतरी? कुठंतरी म्हणजे नक्की कुठं?

सगळं समजण्याच्या पुढं जायला लागलंकि मी डोळ्यावरचा चश्मा काढतो, चोळतो डोळे.
वहीतलं सगळं धुसर दिसायला लागतं
वही बंद करून टाकतो, म्हणतो स्वतःलाच, वाचूया नंतर कधीतरी, तेव्हाच्या समजांचा चश्मा घालून


प्रमोद (२२ डिसेंबर २०१४)

वेळ 



संध्याकाळी, मित्रांच्या रुमच्या दरवाज्याशी 'तो' बसला होता
मी म्हणालो 'काय झालं रे?', म्हणाला 'मला घालवतायेत'

आत गेलो, मित्र बुरसटलेल्या चेहेऱ्याने काहीबाही करत होते
'जाम कंटाळा आलाय यार' एक जण म्हणाला
मी चपापून बघितलं तर कंटाळा सोफ्यावर बसून तिरकस हसत होता

म्हणालो 'चला रे, एक मस्त match खेळू, कट्ट्यावर जाऊन बसू'
कुणी उठणार तेवढ्यात कंटाळा त्याच्या मानगुटीवर जाऊन बसला

जाताना शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो. ' असा वेळ घालवायचा नसतो. बिचारा कसा बसलाय बघा दरवाज्यात'
'अरे आम्ही बरे, काही लोकं तर मारतात वेळ. भयाण सिरिअल समोर किंवा अंधाऱ्या खोलीत laptop समोर बसवून. फार तडफडून मरतो बिचारा.‘

मी एक उसासा सोडून बाहेर पडलो

मला आठवलं लहानपणी एकदा बाबा म्हणालेले,
'वेळ घालवायचा नसतो असा कंटाळ्याला कवटाळून
त्यापेक्षा वेळेला पतंगाच्या शेपटीला चिटकवायचं, हे असं SSS
बघ वेळ कसा उडतोय आकाशात किंवा ठेऊन द्यायचं त्याला एखाद्या सुंदर पक्ष्याच्या पाठीवर भिरभिरत राहतो तो मग गाणं गात‘

मोठा झाल्यावर तोच वेळ मी उद्बत्तीबरोबर देवघरात पेटवून टाकतो,
प्रसन्नपणे दरवळत राहतो तो घरभर
कधी तंबोऱ्याच्या तारेवर बसवून टाकतो त्याला, अन कधी बागेतल्या घसरगुंडीवरून सोडून देतो
तिच्या रेशमी ओढणीवर सोडून देतो कधी, तिच्या मागं मागं लहरत राहतो तो, आणि मी सुद्धा

जाताना मित्रांच्या वेळेला हसवावं म्हणून म्हणालो
'व्यायाम करा म्हणल्यावर म्हणतात वेळ नाही आणि आता…….
…… तुला साठवायला एखादी बँक असायला हवी होती
मग साठवून तुला हवं तसं वापरता आलं असतं‘

तो म्हणाला, ' साठवणं तसं अनैसर्गिकच
तिथे स्विस बँकेत कुजतोय पैसा, आणि चिमणी पोरं उपाशी रडतायत
वेळ म्हणलं तर माध्यम आहे म्हणलं तर अंत
म्हणलं तर सर्कशीतला विदूषक किंवा देव्हाऱ्यातला भगवंत

झालंय असं की माणसांना प्रत्येक गोष्टीची व्याख्या लागते
लागतात प्रत्येक गोष्टीच्या काटेकोर परिसीमा
मी आहेच अनादी अनंत, येत नाही छोट्याश्या मेंदूच्या आवाक्यात
मग माझं अस्तित्वच नाकारलं जातं………।

जाऊ दे, बोलू कधीतरी 'वेळ ' मिळाला तर, आत्ता तुझा वेळ तुझी वाट पाहातोय
त्याच्यावर अन्याय नको

मी माझ्या वेळेकडं बघून हसलो, तो सुद्धा'
'आज तुझ्या नावा करून सोडणार आहे मी समुद्राच्या लाटांवर,
झकास मजा येईल'

आम्ही हसत दारात बसलेल्या मित्रांच्या वेळेकडं बघितलं
त्याच्या चेहेऱ्यावर नव्हता विषाद, तो सुद्धा हसत होता, दिसत होता ऋषी 'निष्काम कर्म' करणारा


प्रमोद (कधीतरी २०१४ साली)

पर्याय



Hibernate चा पर्याय असला तरी घरी जातांना मला shut down करायलाच आवडतं
अनेक windows उघड्या असतात, कुठे कुठला महत्वाचा प्रबंध, कुठे छानशी कविता, कुठे facebook किंवा blog.
कुठे माझाच एखादा अर्धवट लेख, आणि कुठे job opening

सगळं मी वेळ घेऊन बंद करतो, कितीही घाई असली तरी…….
रोज सकाळी कोरी पाटी, कालचं खातं बंद.

कालचे संदर्भ आजला जोडले कि आयुष्य एक अखंड लांबलचक प्रवास होऊन जातं
मधली छोटी मोठी वळणं हरवतात, हरवतात सोनेरी विश्रांतीचे क्षण ………

आणि कालचं अगदी आठवायचच झालं तर history असतेच कुठेतरी. आपल्या नकळत.


प्रमोद ( ७ मे २०१५)

नर्मदे हर!



माझा वेळ वाहून कुठल्या सागरास जाऊन मिळाला असेल कुणास ठाऊक
कुठल्या भूमीवरून खळाळला असेल
कुठल्या कपारीतून कोसळला असेल

असेल अजून तरंगत लहानपणी सोडलेली नाव?
का काळ्या कुट्ट भयाण तळाशी पडली असेल डोळे मिटून?

कुठे असतील काळाच्या ओघात वाहवून टाकलेली तिची पत्रं
आणि विसर्जित केलेल्या नात्यांच्या पुरातन अस्थी

वितळवून टाकले आहेत का मी वेळेच्या साठ्याचे हिमनग निरर्थकतेच्या उष्म्याने ?
त्या सागरातल्या वाढणाऱ्या पातळीसोबत कोणाची आयुष्यं पणाला लागली आहेत?

त्याच सागरातल्या बाष्पाचे काळे ढग कोसळतात आणि वाहात येतात
का कुठल्या निबिड जंगलात आहे ह्या वेळेचं स्त्रोत, कुठल्या महावृक्षाच्या मुळाशी

वेळेच्या प्रवाहासोबत निघालोय परिक्रमेला सागर शोधायच्या आसेनं
त्या सागराला कुणीच पाहिलं नाहीये म्हणे स्वतःच्या डोळ्यांनी, पण चालायला तर पाहिजेच

चला निघतो, भेटू पुन्हा
तुमच्या आणि माझ्या वेळेचे प्रवाह ओलांडतील एकमेकांना तेव्हा

नर्मदे हर! नर्मदे हर!


प्रमोद (२२ एप्रिल २०१५)

गांधीबाबा



गांधीबाबा, तू म्हणाला होतास एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढं करावा.
गाल दोन असतात गांधीबाबा, पण एखादी गोष्ट एकच असेल तर?

एकच असेल आयुष्य, एकच नितळ काचेचं मन,
एकच असेल प्रियकराच्या पहिल्या स्पर्शाने सरसरून उठणारा शहारा तर?

तर ? …….

प्रमोद (६ मार्च २०१५

लपाछपी 



ती शोधायची मला लहानपणी आणि मी लपून बसायचो
इकडे तिकडे शोधणाऱ्या तिला पाहून मस्त खिदळायचो

गंमत म्हणून ती सुद्धा शोधत राहायची मला मी दिसत असूनही

कधीतरी मोठ्ठा झालो मी, आता शोधावं लागणं हा स्वत्वाच्या मूल्यमापनाचा भाग बनून गेलाय माझ्या
कुणी शोधावं असं काही बनूच शकलो नाहीये, तासनतास लपून राहतो कोणी शोधेल ह्या आशेने

ती म्हणते असू दे राजा, नाही होता आलं वेगळं तरी बिघडलं कुठं, तू प्रयत्न केले त्याची ग्वाही द्यायला आहेच ना मी

आता खेळ उरला नाहीये मला शोधणं म्हणजे
आता तिची पावलं अडखळतात, डोळे अधू झालेत, सांधे करकरतात
जंगल झालंय गहन, दाट
आणि मी........

अट्टाहासानं लपून बसलोय कुणी मला शोधावं म्हणून …….

प्रमोद (२२ जानेवारी २०१५)

गटार



म्हणून, म्हणून म्हणत असतो मी की ही असली कामं भरपूर वेळ असतांना काढावीत
सुट्टीच्या दिवशी जास्त वर्दळ नसेल तेव्हा, म्हणजे सगळी उघडलेली झाकणं बंद करता येतात

राहिलं ना उघडं झाकण, अगदी रहदारीच्या रस्त्यावर?
आणि लक्ष सुद्धा नसतं अश्या वेळी
हि अत्माविवंचनेची कामं अशी नाही होत. जगापासून दूर कुठंतरी एकांतवास हवा,
नाहीतर सुरु होते रहदारी नकळत



'हे योग्य आहे का?' अशा काहीश्या प्रश्नावर विचार करत रस्त्यावरून चालत असतांना
अचानक, काही समजायच्या आत मी पडलो स्वतःत, खोल अंधार भरलेला सगळीकडं
पडल्यावर लगेच कळलं गलिच्छ वासाने भरलेलं पाणी आहे खाली
चिखल आहे, घुशी आहेत. कुठून कुठून वाहून आलेल्या कुठल्या कुठल्या गोष्टी
माझं मलाच सहन होईना. इतकं काही शिसारी आणणारं भरलंय माझ्यात?
….
….

अरे हि झाकणं ठेवायचीच कशाला? बुजवून टाकली तर काय फरक पडतो?
तुंबतं आत सगळं? रस्ताच फोडावा लागतो? हं SS
आणि घुशी फारच झाल्या तर सगळा अंतर्भाग पोखरून टाकतात?
हं S S अरे मग झाकणं तरी आठवणीनं लावावीत. चला बंद करून टाका पटकन

….

आत अंधार आणि वर यायला जीना नाही. किती वेळ तिथंच पडून राहिलो कोणास ठाऊक
हे सगळं साफ करायला हवं असं जाणवत होतं, मनातल्या मनात एक आराखडा बनवून टाकला
….
….

अरे झाकण लावताय काय? आत कुणी पडलं नाहीयेना ते बघा एकदा.
काय? आहे? काढा बाहेर. हं टाका दोर, पकड म्हणावं घट्ट
…..
…..

'काय ठीक आहात ना? अहो तुमच्याशी बोलतोय? अहो?'
हं, कुठला तरी मोठ्ठा धक्का बसलेला दिसतोय, जाऊ द्या होईल ठीक.
चला लाऊन घ्या झाकण पटकन. आणि हो लक्षात ठेवा… …
हि अत्माविवंचनेची कामं अशी नाही होत. जगापासून दूर कुठंतरी एकांतवास हवा,
नाहीतर सुरु होते रहदारी नकळत
 
प्रमोद (२० जानेवारी २०१५)

रिक्षावाला



रिक्षावाला जेव्हा निघत असेल रोज सकाळी तेव्हा कुठली दिशा पकडत असेल, कुठं जाण्यासाठी?
आणि परतत असेल घरी तेव्हा काय सांगत असेल, कुठं जाऊन आलो म्हणून?


होत असेल त्याच्या मनात दिशांचा कल्लोळ?
जावं लागत असेल त्याला एखाद्या दारासमोरून, पुनःपुन्हा, त्याची इच्छा नसतानाही?
का, स्वतःच्या दारासमोरून, रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या आपल्या मुलाकडं परक्यासारखं बघत?

प्रवाश्यांच्यासोबत काम, क्रोध, रज, तम आणि सात्विक, सगळे गुण उतरून जात असतील रिक्षातून?
का, सीटच्या सांधे-कपारीत जमा होत असतील रस्त्यावरच्या धुळीसारख्या?

दिवसभरानंतर काय शिल्लक उरत असेल? पुनःपुन्हा मोजलेल्या नोटा, अंगदुखी, घशात-कानात-फुफ्फुसात काळी माती आणि, मनात, निर्वात पोकळी?

परवा कुठंतरी जातांना रिक्षावाल्याला म्हणालो, "खरं सांगू, मला सुद्धा तुझ्यासारखंच वाटतं कधी कधी,
आयुष्यभर दुसऱ्याची स्वप्नं बसवून फिरत राहतोय मी, स्वतःला कुठं जायचंय ते माहीतच नसल्यासारखा

रिक्षावाल्या मला सुद्धा तुझ्यासारखंच वाटतं कधी-कधी

प्रमोद (सप्टेंबर ९, २०१४ )

डिमॉनेटायझेशन



ऑफिसात जातांना तुला बाय म्हणायला स्वयंपाकघरात आल्यावर
तू दिसायचीस पाठमोरी
वाटायचं तुला एक मिठी मारावी, एक निरोपाचं चुंबन

पण तू सुद्धा असायचीस घाईत आणि मी थिजलेला
कारण मनगटावरचं घड्याळ होऊन जायचं मणाचं

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर काढायचो piggy bank ज्याच्यात ठेवून द्यायचो ती चुंबनं आणि मिठ्या
कधी कधी बँक उपडी करून मोजत बसायचो माझी श्रीमंती

परवा, मन कि बात मधे डिमॉनेटायझेशन झालं
बँकेतले कष्टानं कमावलेले माझेच पैसे जेव्हा काढणं मुश्किल होऊन बसलं तेव्हा लगेच.....

लगेच रजा टाकली आठवड्याची, बुक करून टाकलं हॉटेल निसर्गरम्य ठिकाणी
बुकिंगसाठी online व्यवहाराच्या टिप्पणीमधे लिहिलं .......

'to_empty_piggy_bank'......


प्रमोद (३० मे २०१५)

घाई आणि तू



अघोरी घाईनं गाडी चालवून इच्छित स्थळी पोहोचल्यावर,
गाडी बंद करतांना नेमकं सुरेख गाणं लागावं
आणि मी पुढची सगळी कामं सोडून बसून राहावं, घाईला पार्किंग ब्रेक लाऊन
तसंच झालंय माझं,

तू भेटल्यापासून.....


प्रमोद (३० मे २०१५)

धन्यवाद!



भरल्या प्रेक्षागारात कुणी सादर करत होता माझ्या कविता; स्वतःच्या म्हणून
दरवाज्याबाहेर चवड्यांवर उभा मी, अस्तित्व फक्त कान बनून उरलेलं

एखादी कवितेची परमोच्च आनंद देणारी ओळ ऐकली की भाव-ओल्या डोळ्यांनी
चांदण्यांनी लगडलेल्या आकाशाकडं पाहात म्हणायचो. . . “बनानेवालेनेभी क्या चीज़ बनाई है!”

तू सुद्धा प्रेमाने ओथंबलेला बघायचास माझ्याकडे, एखादा तारा बनून मिचकावायचास डोळे . . मिश्किलपणे म्हणायचास...
‘धन्यवाद!’


प्रमोद ( २१ ऑगस्ट २०१४ )

पण.....



वाळला अश्रु चेहेऱ्यावरचा, हृदयात त्याच्या व्रण होता
'नाही' म्हणाली नाही ती, पण शेवटी एक 'पण' होता

दफन करतांना आठवणीही, पुरलं नाही खोल त्यांना
विसरण्याची शपथ घेतली, पण शेवटी एक 'पण' होता

होते शत्रू अन सोयरेही, नजरेत राग ना शिकवा त्यांच्या
आयुष्याची वही संपतांना, जन्मला सोनेरी एक क्षण होता

हुंडा मागून परततांना, कचऱ्यात माश्यांनी घेरलेला
पाकळीसम तलम गुलाबी, चिमुकलीचा एक भ्रुण होता

(भ्रुण - fetus)

पावसाची वाट पाहतांना, अर्धपोटी, दरिद्री आतुर होता
कारण त्यानं पेरलेला, आशेचा शेवटचा एक कण होता

- प्रमोद खाडिलकर
२९ मार्च २०११

शवागाराचा चौकीदार

त्या कळीकभीन्न इमारतीच्या काळोख्या व्हरांड्याच्या शेवटाला, शवागाराच्या दाराशी

बसलेला असतो एक चौकीदार, गंभीर, स्वतःतच गर्क.
जिवंत माणसांशी बोलणं टाळणारा
(त्याला कुणी चौकीदार म्हणून संबोधलेलं आवडत नाही, तो स्वतःला द्वारपाल म्हणवून घेतो)
माहित नाही किती वर्षांपासून तो राखतोय प्रेतं, प्रेतं उरत नाही बोलायला ते बरंय नाहीतर.....
पण प्रेतांचा विषय काढला कि बोलायला लागतो तो
सांगायला लागतो त्यानं पहिल्यांदा राखलेल्या प्रेता बद्दल,
म्हणे एक नवविवाहिता होती. हातात हिरवा चुडा, कपाळावर मळवट
गप्प होतो थोडा जणू काही पाहात असल्यासारखा
..... आणि नंतर तासनतास बोलत राहतो प्रेतांच्या बद्दल

बोलायला लागल्यावर सांगतो अजून गुपितं..... म्हणे प्रत्येक प्रेताची अशी एक भाषा असते
प्रत्येक प्रेताच्या जन्माची एक कहाणी.
प्रेतांना असतात भावना, शरीरधर्म. असते अंताची हुरहूर, असतात अनंताचे वेध.

तो रचना करतो प्रेतांची जातीनुसार, विटाळ टाळण्यासाठी
कुणा सवाष्ण स्त्रीच्या प्रेता जवळ ठेवत नाही परपुरुषाचं प्रेत
म्हणतो, पुरुष जातीचा काही भरवसा देता येतो का?
श्रीमंत सुखवस्तू सुगंधी प्रेताजवळ ठेवत नाही भणंग भिकाऱ्याचं प्रेत, बुरसटलेलं.
खूप वेळ घालवतो हि सगळी रचना करण्यात, कधी कधी सगळी प्रेतं हलवावी लागतात एका नवीन प्रेतामुळं. पण तरी कंटाळत नाही

कशाला करतोस हे सगळं? का प्रेतांनाही हे सगळे नियम लावतोस जिवंत असतानाचे?
तो डोळ्यात डोळे घालून पाहत थंडपणे म्हणतो,
'जिवंत असण्याला विनाकारण महत्व देतो आपण, कशावरून आपण मरतो जेव्हा मरतो आपण किंवा जिंवंत असतो जिवंत असतांना?'

आणि शांतपणे आपली प्रेतांची यादी पाहत राहतो नवजात प्रेताला कुठं ठेवायचं याचा विचार करत

प्रमोद (११ मार्च २०१७)

एकटा



कर्कश्श रडणारं मूल अचानक शांत होतं ना अगदी तसाच रस्ता, अचानक, शांत झाला
तार स्वरात किंचाळणारी रिक्षा नाही ना टायरचा खरखराट, चालणं म्हणजे सुख झालं

मग मी सुद्धा माझ्या चालण्याचा वेग मंदावला, मंदावले श्वाससुद्धा. पाहिलं एखादा पक्षी दिसतोय का
किंवा माझ्याच मनात दडलेला एखादा रंगीबिरंगी पक्षी बोलतोय का काही माझ्याशी सगळं निश्चल असतांना

असा स्वतःच्या धुंदीत मग्न चालत असतांना समोर दिसला कुणाच्या तरी केसांतून सुटून पडलेला 'गजरा'

हलकेच उचलून घेतलं त्याला ओंजळीत, गजरा सुद्धा आक्रसून घेत स्वतःला कुशीत शिरला
जत्रेत आईचा हात सुटून मागं राहिलेल्या पोराला कुणीतरी मायेनं डोक्यावर हात फिरवून कुशीत घेतल्यावर,
भरल्या डोळ्यांनी ते पाहतं ना, तसाच काहीसा 'गजरा' माझ्याकडं पाहात राहिला

मी विचार केला, कोण आणि कशी असेल हि गजरा माळणारी?
असेल गोरीघारी का एवढीच हौसमौज परवडेल अशी गरीब कामकरी?
सकाळच्या गडबडीत खास थांबून घेतला असेल गजरा, का सिग्नलवर कुणी माथी मारला असेल?
का कुणी माळला असेल प्रेमानं आणि त्यानंतर एखादं चुंबन पाहून डोळे मिटून घेतले असतील ह्यानं?


सुंदर दरवळणारा मोगऱ्याचा सुवास एकदा छाती भरून घेणार इतक्यात थबकलो, वाटलं
गजऱ्याला चिकटला असेल गंध त्या केसांचाही,
कुठल्या अनोळखी पुरुषानं त्यांचा वास घेणं कदाचित आवडणार नाही कोणा 'ती'ला

कळेना काय करावं, आजूबाजूला पाहीलं तर शेजारीच पडलेला एक दगड शेंदूर फासलेला
वर्षांत कुणाला त्याच्यातल्या देवपणाची प्रचीती आलेली दिसत न्हवती, शेजारीच बसलेलं एक कुत्रं रोगट

देवावर तसा विश्वास नाही माझा, पण अविश्वास दाखवावा असंही काही केलेलं ऐकिवात न्हवतं
वाहला गजरा त्याच्या पायाशी, म्हणजे जिथे पाय असेल असं वाटलं तिथं. दगड निर्गुण निराकारपणाचं उदाहरण होता अगदी मूर्तीमंत

चालायला लागलो, एक दोनदा वळून पाहिलं, वाऱ्याच्या झुळूकेनं गजरा दगडाच्या खोबणीत जावून बसला
वाटलं चला, हे चांगलं झालं, दोघांचंही एकटेपण खुंटलं, राहतील दोघं सुखदुःखाच्या गप्पा करत

पाहा कसला कसला ऋणानुबंध असतो. त्या मागं पडलेल्या गजऱ्याला मदत करायला गेलो
तो निर्माल्य होवून मातीत मिसळलासुद्धा, त्या दगडाचं एकटेपण खूपायला लागलं म्हणून एक फुल मात्र वाहतोय रोज आठवणीनं . . .

- प्रमोद खाडिलकर

आत



आज अचानक ती दिसली समोरून चालत येतांना
खाली मान घालून धरणीला काहीतरी सांगत असल्यासारखी

ती हसते आतल्या आत, आतल्या आतच रडतेही
ती फुलते आतल्या आत, आतल्या आतच उन्मळून पडते

लहानपणी कधीतरी कुणीतरी तिला तिच्यातच कोंबून टाकलेलं
बाहेर यायचा आटोकाट प्रयत्न केल्यावर थंडपणे दार बंद केलेलं

आता ती सांगत असते, आतल्या आतच तिनं एक बाग फुलवली आहे म्हणे
घोड्यावर बसून एक राजपुत्र येतो आणि दूरवरच्या देशात घेवून जातो, आतल्या आत

आतल्या आतच, एक बंगला त्या समोर सुंदर तळं, हिरवळ आणि एका बाजूला स्मशानभूमी
बंगल्यातल्या शेकोटी साठी लाकडं कमी पडली तरी स्मशानभूमीतल्या लाकडांना हातही लावत नाही ती

ती भेटल्यावर मी तिला थांबवतो, एकदम दचकून वर बघते, भेदरलेली
मग अचानक स्निग्धसं हसते, डोळे जाणवतात जरासे पाणावलेले

मी विचारतो, कशी आहेस?, आधी मान हलवते मग म्हणते 'छान !'
'चल एक चहा घेऊयात?', एकदम गांगरून जात म्हणते, 'नको उशीर होईल'

मी तिच्याकडं बघून व्याकुळतेनं म्हणतो, 'एकदा बाहेर पड ना स्वतःतून, मी मदत करेन तुला'
भरलेल्या डोळ्यांनी म्हणते, 'बाहेर पडायचा रस्ताच हरवून गेला आहे, रान माजलय सगळं तिकडं'

एका अस्वस्थ शांततेनंतर एकदम चमकणाऱ्या डोळ्यांनी म्हणते,' त्यापेक्षा तूच येना आत, अगदी स्वप्नवत आहे सगळं'
'तिथंना तुला आवडतो तसा झोपाळा आहे, जुईच्या वेलीची कमान आणि …… . .', माझ्या डोळ्यातील अविश्वास आणि कीव बघून एकदम थांबते

स्वतःला पुन्हा स्वतःत पुरून घेत, सावरून घेते वह्या छातीशी, चेहरा एकदम निर्विकार करून टाकते
'चल, बागेतल्या झाडांना पाणी घालायला हवं, सुकून जातील नाहीतर', जातांना थांबते एक क्षण, वळून बघते

एक संक्षिप्त नजरा नजर आणि मग पुन्हा जमीनीकडं बघत निघून जाते
मी पाहात राहतो तीला स्वतःमध्येच अदृश्य होतांना

मी नुसताच पाहात राहतो तीला स्वतःमध्येच अदृश्य होतांना


प्रमोद १८ ऑक्टोबर २०१३

सेकंदं आणि मिनिटांचं गणित



सकाळी सकाळी घड्याळच येतं, डोळे वटारून बघतं आणि हृदयात, मेंदूत खोल हात घालून सगळीकडं सेकंद आणि मिनिटांचं गणित भरून टाकतं

मग मी माझ्या लेकीच्या (सईच्या) गालावरल्या काही सेकंदांची पापी घेतो, 
काही सेकंदच फिरवत राहातो तिच्या पोटावरून जोपर्यंत दिसत नाहीत काही जागे सेकंद तिच्या डोळ्यात
काही अनेक सेकंद तिच्या अंगाखाली चिरडले गेले कि मग मी घशात काही सेकंदांचा खर्ज भरून तिला काही सेकंदाचं रागावतो

काही गरम मिनिटं बादलीत भरून बदाबद ओतून घेतो अंगावरून, आणि वेड्यासारखा अंगाला चिकटलेले सेकंद खरवडून काढत राहातो साबणानं
सईच्या आंघोळीच्या वेळी नकळतच उठतात सेकंद खाणारे साबणाचे राक्षशी फुगे
त्यानंतर प्लेटमध्ये भरून घेतो गरमागरम कांद्याची फोडणी घातलेली काही मिनिटं , कपात भरलेल्या मिनिटांवर फुंकर मारून उडवून लावतो काही सेकंद

शाळेला जातांना एकाच वेळी बाहेर पडलेली अनेक लोकांची अनेक मिनिटं येवून थांबतात लाल दिव्याजवळ आणि वाजवत राहतात कर्कश्य अनेक सेकंदी हॉर्न

शाळेत सई टाटा करत उभी राहिली कि तिच्या हाताच्या बोटां पाशी काही सेकंद फिरतांना दिसतात जत्रेतल्या गोल चक्रात बसल्यासारखे

त्यानंतर, मग अचानक ओघळणाऱ्या घामाबरोबर, पाया खाली कुरकुरणाऱ्या पानां बरोबर सेकंदं आणि मिनिटांचं गणित विरून जातं कुठल्या तरी कृष्ण विवरात
आणि मग येते कविता, जगणं मोजायचं नवं परिमाण बनून


आणि मग येते कविता, जगणं मोजायचं नवं परिमाण बनून


प्रमोद (३ मार्च २०१४)

मरण 



रोजच्यासारखा वाहात होता रस्ता, 'मरण'घाई असलेल्या गाड्यांसोबत
मी, नेहमीसारखा मागं पडायच्या अट्टाहासानंच शर्यतीत उतरल्यासारखा, सायकलवर

काहीतरी वाजत होतं बहुतेक ear phones वर किंवा डोक्याच्या पोकळीत घुमत असेल विचारांचा पारवा, आठवत नाहीये
तेवढ्यात, अगदी शेजारून कार वेगात पुढं गेली फुटपाथच्या जवळ जात, आणि क्षणार्धात

क्षणार्धात अर्धवट उघडलेल्या काचेतून 'ती' फुटपाथवर फेकली गेली. थोडी फरफटून विसावली. धुराळाही उडाला नाही

मी विस्मयानं पुढं गेलो, नंबर टिपून घ्यायचा विचार मनात आला पण गाडीचा वेग विचारांपेक्षा थोडा जास्तच होता
वेदनांनी कळवळणाऱ्या तिच्या चेहऱ्याकडं जरा दुरूनच पाहात राहिलो
मी पाहातो आहे हे लक्षात आल्यावर तोंड लपवून रडत राहिली, हमसून हमसून

मी विचारलं, 'काय झालं इतकं टोकाचं वागण्यासारखं? कारकडे बघून तरी वाटतंय की वहीत आणि घरात जागा भरपूर असेल'

ती, 'आजकाल नुसता business channels बघत असतो, 'return on investment' फार चांगली नाहीये म्हणतो माझ्यावर'
'आता झालं आहे लग्न, त्यामुळं वाढदिवसाला platinum दिलंकी काम भागतंय
रसिक मित्रही पांगले आहेत आणि excel मध्ये फार छोटे रकाने असतात म्हणे कविता लिहायला'

मी, 'अगं वाटतं खूप लिहावसं पण वेळ नसतो. मी मात्र अर्धवट कविता जपून ठेवल्या आहेत हं , टाकल्या नाहीत अश्या'
एकदम तीटकाऱ्यानं माझ्याकडं पाहात ती म्हणाली, ' तू सुद्धा कवी आहेस वाटतं ?'


तिच्या भकास चेहेऱ्याकडं पाहून कसंतरीच वाटलं. कविता वाचनात घेतलेल्या टाळ्यांमुळं मदत करणं गरजेचं वाटलं
दिवसभराच्या, महिन्याच्या, वर्षाच्या कामाचा, अर्धवट कवितांचा हिशोब केला. सहानुभूतीनं विचारलं 'दत्तक घेऊ का तुला?'


कवीचं आणि गणिताचं तसं वाकडंच. चेहऱ्याची काळी कुळकुळीत पाटी होऊन जाते आणि ठळक अक्षरात दिसतात मनातले हिशोब


चेहेऱ्यावरचा हिशोब पाहून अनाथ मुलीसारखी हतबद्ध वाटणारी ती अचानक वृद्धाश्रमातल्या म्हातारीसारखी करारी, हट्टी झाली
'नको, कविता घेता येत नाहीत दत्तक, अनाथ मुलांसारख्या, अनाथ कवितांनी मरून जाणंच योग्य'

मी म्हणलं, 'मग थोडं पाणी वगैरे?' ती नुसती पाहात राहिली आकाशाकडं कोरड्या डोळ्यांनी.
मी एक उसासा सोडून मौन पाळलं एका मिनिटाचं. ओळखीच्यांना फोनही केला कवितेचे शेवटचे काही विधी असतात का ते विचारायला
मग जमा केल्या काही काड्या त्यावर ठेवला कवितेचा मृतदेह आणि पेटवून दिला साश्रू नयनांनी

सायकल हातात घेऊन चालत राहिलो जड पावलांनी, मधेच एकदा थांबून वळून पाहिलं

परत जाऊन उचलली थोडी राख, बांधून ठेवली पुडीत. वाटलं कुठंतरी विसर्जित करावी किंवा ठेऊन द्यावी नुसतीच, माझ्या अर्धवट कवितांचा विसर पडू नये म्हणून !

प्रमोद ( एप्रील २०१३)

तुजहून बरे तर अश्रू आहेत



तुजहून बरे तर अश्रू आहेत
न बोलावता येतात भेटायला
जातातही राज्य सोडून चाललेल्या निरीच्छ बुद्धासारखे

सपशेल निघून जातात
सोडत नाहीत माग, श्वासागणिक छळणारे

तुजहून बरे तर अश्रू आहेत
नितळ, गम्य. कोड्यात न पाडणारे
तू श्रीकृष्णाच्या गीतेसारखी
कुरुक्षेत्राच्या मधोमध उलगडणारी

तुजहून बरे तर अश्रू आहेत
साठवायला सोप्पे, मोहरीच्या दाण्यायेवढी वेदना, बस
पेरायची हृदयात आणि फुटलेल्या ढगासारखे अखंड वाहत सुटतात
तुला साठवायला आकाश कमी पडतं, फुलांचे रंग
रक्ताचे थेंब, सहस्त्र भावना, अब्जावधी शब्द
तरी दरवेळी वाटतं तू थोडी राहिली आहेस, माझ्या कवेबाहेर

तुजहून बरे तर अश्रू आहेत
तुजहून बरे तर अश्रू आहेत

प्रमोद (१९ ऑक्टोबर २०१४)

स्वैर संयत ?



स्वैर संयत ?

माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे.

त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.

माझ्या स्वैरपणाचं मला कौतुक नाही ना संयतपणाचं, त्याच बरोबर मी त्याच्यामुळं खजीलही नाही…. स्वतःच्याच हाताकडं बघितल्यावर कुठल्या परक्याच विचित्र गोष्टीकडं पाहत असल्याचा भास होतो ना कधीकधी तसा काहीसा भास होतो मला स्वतःच्या कवितांकडं बघतांना. त्या कधी मला प्रचंड आवडून जातात आणि कधी खूप पाणी घातलेल्या चहा सारख्या सप्पक बेचव वाटतात…