Monday, 30 November 2020

आठव

फोन संपताना
कुजबुजत विचारलंस तू
'मग माझी आठवण आली का?
कितीदा?''

मला आठवला वास
कपाटाचं दार उघडल्यावरचा
तलम

दारात ओशाळलेला दूधवाला
'साहेब बिल द्यावं लागतं'
म्हणत हसणारा

तू लावलेल्या अलार्मवर
झाडांना पाणी घालताना
गुलाबाच्या झाडानं
लाजत दाखवलेलं कोवळं फुल

आज जेवायला पास्ता मी करू का?
शेवटची मेल पाठवून
नकळत मारलेली हाळी

पहाटे पसरलेली मिठी
आणि भकास पसरलेला पलंग

आठवांचे प्रकार किती
वाटा किती
पोहोचतात फक्त
तुझ्या हातांशी

लहानपणी नेटाने
तारे मोजायचो
कधीतरी सोडून दिलं मोजणं

तसंच तुझ्या आठवांचं

'लौकर ये'


स्मृती, तुझ्यासाठी!


प्रमोद
३० नोव्हेंबर २०२०

Saturday, 21 November 2020

स्मशानाच्या वाटेवर


ठाऊक नाही का
पण ती स्मशानाच्या वाटेवरच भेटायची
नेहमी

स्मशानाच्या वाटेवरच
उमलायची फुलं,
बागडायचे पक्षी,
वाकायचा आंबा.

स्मशानाच्या वाटेवरच
चमकायचे काजवे,
उतरायचा चंद्र,
वाहायचे वारे

स्मशानाची वाट
सांगायची बहुदा
आयुष्याचे पाश तोडायला
मरावं लागत नाही
जगावं लागतं

प्रमोद
20 नोव्हेंबर 2020

Monday, 9 November 2020

कंटाळा


निघालोय गं.....

हो, आहे ना
बरोबरच आहे

कुठं सोडू त्याला आता?
शक्य नाहीये ते

असला बरोबर तर
बिघडतंय कुठं?
असतो ना गपचूप
कडेला बसून.

नाही!

नसतं माझं लक्ष त्याच्याकडं
आणि तोही करत नाही ढवळाढवळ

काय बिघडतंय असला तो
आपल्या संभोगाच्या वेळी तिथंच तरी?
पाहात राहील आपल्या शरिरांच्याकडं.

तू ते शोधून शोधून जमवलेले
कलात्मक पॉर्न.

त्यात गृहीत धरतेसच ना
कॅमेरामन?
त्याला कितीसं कुतूहल असेल
समोर दिसणाऱ्या संभोगात?
तो तिथं चालतो
निरस,
तसाच हा इथं.

अगं कुठलंही नातं
शाश्वत असण्याची शाश्वती कुठंय?
उद्या तू जाऊ शकतेस.
किंवा आत्ता सुद्धा दरवाजाच उघडला नाहीस तर?

गाडी वळवल्यावर
मागच्या सीटवर थाप मारली
कि हा असतो हमखास.

तुला सांगतो
तू सुद्धा ठेवत जा कंटाळा सोबत
माझ्या आणि तुझ्या कंटाळ्याचं
affair झालं तर?
शक्यता वाढेल
आपलं नातं टिकायची.

टपरीवर थांबतो
तिथंच ये मग घरी जाऊ
चहा घेऊ थोडा
जाम कंटाळा आलाय

प्रमोद
९ नोव्हेंबर २०२०

भेट - २

सगळीकडे होर्डिंग्स लागलेत फार 
जाहिरातींचे कर्कश्श भोंगे 

फार उजेड असतो तिथं
आणि डोळे बंदच होत नाहीत
आजकाल 
साला मी हि दिसत राहतो
आणि तू सुद्धा

तुझ्या माझ्या तळहातांच्या मधे
जी अंधारी पोकळी निर्माण होते
तिथंच भेटूया! 

येशील?

प्रमोद
७ नोव्हेंबर २०२०