मला कळलं न्हवतं कधी
पण पर्वताच्या आठवणीनं
धाय मोकलून रडताना
मी उभारला होता माझा पर्वत.
मी माझ्याच घरात
लावली होती झाडं
व्हरांड्याच्या अंधाऱ्या बोळात
हळू हळू घरातच
फोफावलं
संपूर्ण जंगल
धावलो होतो
सशांच्या मागे
केली होती शिकार
हिंस्त्र पशूंची,
झेलल्या होत्या जखमा
कुणीतरी गंभीर चिंतीत चेहऱ्यानं म्हणलं
हे असं
आभासी जग
चिरंतन नाहीये
चिरंतन फक्त निसर्गच!
मी हसून म्हणालो,
'म्हणूनच!'
आणि टारझन सारखी आरोळी ठोकून
झाडाच्या पारंब्यांना लटकून
निघून गेलो
शिकारीला
प्रमोद
२९-४-२०२०