Monday, 27 June 2022

फ्लाय ओव्हर


नेहमी ज्या ठिकाणी येऊन
अडलेपण यायचं
त्यातून उद्भवायचा वैताग
निर्माण व्हायची कटुता
त्या नात्यावर मी सरळ
एक फ्लाय ओव्हर बांधून टाकलाय


आता सरळ ओलांडून जातो मी
त्या नात्याला
सुसाट


परवा असाच विचारांच्या गुंत्यात 
फ्लाय ओव्हर घ्यायचा चुकला
खूप दिवसांनी फ्लाय ओव्हरच्या
खालची दृश्यं बघितली


खूप हळहळलो
रयाच गेली होती त्या चौकाची
काळाच्या ओघात टाकाऊ गोष्टींची
गर्दी,
विझुन गेलेल्या डोळ्यांची लोकं
नुसतीच टकामका बघत होती
माझ्या चकचकीत गाडीकडे


पुन्हा डोळे फेरत होती
कारण
त्या काळ्या काचेत त्यांना दिसत होती
त्यांच्याच डोळ्याखालची वर्तुळं


फ्लाय ओव्हर खालून
पुन्हा राजमार्गाला लागलो
शोधले मोबाईल मधे काही नंबर


आणि तोडायला घेतले
फ्लाय ओव्हर


प्रमोद
१३ जून २०२२

Saturday, 28 May 2022

दोघे


असहाय्य, दोघे,
पाहात राहिले कुणा एकाचा मृत्यू

त्या कुणाची जगण्याची अपार इच्छा
मृत्यू चिरडून टाकताना
जमिनीवर घासणाऱ्या टाचा
श्वासांअभावी
उलटा ताणलेला कणा
घशातली घरघर   
आणि अखेरच्या क्षणात शरीराची थरथर

दोघांतला एक,
भेदरला
लपत राहिला सर्वव्यापी मृत्यूपासून
त्या कुणाच्या यातना स्वतःच्या शरीरावर परिधान करत
कल्पित राहिला स्वतःचा मृत्यू त्या कुणाच्या मृत्यूत


दुसरा,
शांत झाला
धावत मृत्यूच्या जवळ गेला,
पाहात राहिला त्याच्या डोळ्यात डोळे घालून
मृत्यूनंतर,
त्या कुणाच्या चेहेऱ्यावरची अपार शांतता स्वतःच्या शरीरावर परिधान करत
कल्पित राहिला स्वतःचा मोक्ष त्या कुणाच्या मोक्षात

प्रमोद
२८ मे २०२२

Thursday, 19 May 2022

दुक्ख

'अजाण हायस ग पोरी, तुले समजायचंय समदं'

'टाकलंस कशापायी चुलीत दुक्ख? वाटलं व्हय कि जळून जाईल'

बघ ह्यो समदा धूर झोपड्भर'
'इवलंस दुक्ख आता आभाळभर झालं, न्हवं'
'रडवीत ऱ्हायील आता तुले दिसभर'
'आन सायंच्याला, बनलेली राख ताटलीत भरून टाकायला जाताना'
'नेमकि येईल हवा, आनी त्ये इवलंस दुक्ख जमीन भर होईल'
'पायाला लागून समदीकडं होईल, अगदी हंथरुनात जाईल'
'मंग दिवसासारख्या रात्रीबी ओल्या'

सांगितलं व्हतं तुला, ओलं दुक्ख जळत न्हाई'
त्याले वाळू द्यावं लागतं
टाकून द्यायाचं आयुष्याच्या उन्हात, चांगलं वाळू द्यायचं
छान रचून ठीवायची वाळलेली दुक्ख
मंग त्या दुक्खाला टाकायचं चुलीत, झकास चा करायचा 
आणि एक्ल्यानं बसून प्यायचा. 
व्हतो थोडा धूर तवाबी, वहायची थोडी टिपूसं त्या दुक्खाचं देनं म्हणून.......

पोरी, हिकडं ये. ये गो माय. पूस डोळं. 
पोरी, ह्ये समदं सांगायलाच तर आय अस्ते न्हवं. 
उगी उगी रडू नकोस...... पर एक लक्षात ठिव
ओलं दुक्ख जळत न्हाई, ठार वाळू द्यावं त्याले
आन इश्वास ठिव माजेवर, 
केवढं भी आभाळभर दुक्ख असीनाका, त्ये वाळतच. 
जगत रहावं माय, जगत रहावं 

प्रमोद खाडिलकर 

Saturday, 12 March 2022

पुन्हा रिक्षावाला


रिक्षात बसल्यावर,
रिक्षावाला पुनःपुन्हा विचारत राहिला
'कुठं? कुठं जायचंय?'

मी पुनःपुन्हा सांगत राहिलो
'कुठंच नाही, तू चल'

'मुक्काम ठाऊक असल्याशिवाय
निघू कसा मी?'
रिक्षावाला वैतागून म्हणाला

'निघण्यासाठी मुक्काम नाही
सशक्त पाय लागतात.
एक सुरा, बंधनं कापून टाकायला.
सुहृदता लागते रस्त्याशी नातं जोडायला.
चल तू, जो रस्ता तुझ्याशी बोलेल तिकडं'

असेच फिरत राहिलो
रस्त्याचं होकायंत्र वापरून.
अचानक ओरडलो, 'थांब'

व्यवहार पूर्ण करून निघालो.

रिक्षावाला म्हणाला,
'इथंच जायचं होतं तुम्हाला?'

'नाही, पण इथं 'पोहोचलो मात्र आहे'


प्रमोद
१२ मार्च २०२२

Saturday, 15 January 2022

अपूर्ण

कवीच्या पिंडाला कावळा शिवत नसतो तेव्हा

त्याच्या मनात राहिली असते
एखादी कविता अपूर्ण?

का

राहून गेलेलं असतं
सगळ्या कविता शोधून
त्यांची होळी करणं,

ती राख फासून
आत्मप्रेमात फिकट झालेली पाटी
काळीकुट्ट करून ठेवणं

चुकून पुन्हा कवीचाच जन्म मिळाला तर?

पुन्हा तो कोरा करकरीत
ठळक
मंगलमय
शब्द उमटावा म्हणून

प्रमोद 
१५ जानेवारी २०२२