Tuesday, 26 October 2021

वेदना


काही तरी खोल
अवर्णनीय
दुखत होतं
छातीत, मेंदूत
मनात किंवा
कुठंतरी


X Ray काढले,
CT scan झाले


specialist म्हणाले
सगळं नॉर्मल आहे
हा आजार म्हणजे
खेळ आहे मनाचा


मग psychologist झाला
त्यानंही हात टेकले


नवस झाले,
अभिषेक झाले
बाबा झाले
गंडे दोरे झाले


नातेवाईक भेटायला यायला लागले
उसासे, चिंता किंवा कुचकट हास्य
काहीतरी भेट मिळायचीच


शेवटी तो आला
सगळे दरवाजे लाऊन घेतले
सगळ्या सिरीयल बंद केल्या
TV वरच्या
बंद केले सगळे आवाज
डोळे मिटून शांत म्हणाला
ऐकव


मग पुढची काही शतकं
ऐकत राहिला माझ्या कविता
कुणीच न ऐकलेल्या
बिलांच्या मागे ,
प्रोमोशन लेटरच्या खाली रिकाम्या जागेत,
X ray च्या काळ्या काळोखात
हातावर गोंदवलेल्या
कविता


तश्या निरुपयोगीच
पण तरीही सुचलेल्या
तोंडात स्रवणाऱ्या लाळेसारख्या
कधीतरी अकारण वाहणाऱ्या अश्रुंसारख्या
शेवटी ऐकवल्या सगळ्या
मग त्याने त्याच्याही
मग दोघांनी मिळून
शेकोटी केली सगळ्या कवितांची
राख विसर्जित केली
तुळशी वृंदावनात


सगळे बंद दारामागे
चिंताक्रांत उभे
मग तो एक कुठलासा रसिक
निघून गेला


माझ्या शांत वेदनाविरहित
चेहेऱ्याकडे बघून
आश्चर्यचकित होऊन
सगळे
अंदाज बांधत राहिले
काय जाळल्याचा वास येतोय ह्याचा


प्रमोद
२६ ऑक्टोबर २०२१

Sunday, 18 July 2021

Guilt


एक असामान्य guilt पाळलीये मी
कारण मी स्वतःच समजतो स्वतःला
representative सगळ्या
खादाड, राक्षसी, निर्ढावलेल्या मनुष्य जातीचा

मला वाटतं मीच आहे ठिणगी
जी जाळते आहे जंगलं
होरपळवते आहे प्राणी
मला वाटतंय मीच आहे कीटकनाशक
ते पाजणारा हात
ते विकत घेणारी उधारीची नोट
जी आतडं पिळवटून
जीव घेतीये शेतकऱ्याचा

privileged असल्याचं दडपण घेतलंय मी
मी स्वतःला समजतोय सावकार
ज्यानं लुटलंय गरिबांना

मला पडतात स्वप्नं ज्यात
मी पुरतोय धनाचे हंडे
त्यावर पसरतोय सांगाडे
मीच मारलेल्या मनुष्यांचे
धन जमा करताना

कुणा पूर्वजांनी केलेल्या पापाखातर
कोण जाणार फासावर?
ह्या प्रश्नावर मी अधाशीपणे
वर करतोय हात
घेतोय निरोप आप्तेष्टांचे
पुन्हा धरतोय जबाबदार स्वतःला
त्यांच्या होऊ घातलेल्या
हालअपेष्टांचे

माझ्या कुठल्याश्या पूर्वजांनी केली आहेत
अपार पुण्यंही
त्यावरचा अधिकार मात्र मी
सोडून देतोय
कुठल्याश्या उदात्त, अगम्य भावनेनं

एक असामान्य guilt पाळलीये मी
जी तोडतीये लचके माझ्या
छोट्या छोट्या निर्मळ आनंदांचे
जे मी कमावले आहेत कष्टाने
कुठलाही भ्रष्टाचार न करता
कुणाच्या पाठीत सुरा न खुपसता

मला व्हायचं नाहीये
निर्लज्ज, असंवेदनशील किंवा आंधळाही
पण हि सगळ्या विश्वाची
युगा अठ्ठाविसांची guilt सुद्धा नकोय


प्रमोद
१८ जुलै २०२१

Wednesday, 14 July 2021

वाहणं


घरासमोरच्या ओढ्यात
सोडून दिलेली नाव
पत्र बनून परत आली

तरंगण्याचा आनंद, वेगाचा उन्माद
आकस्मित हेलकावे, बुडण्याची भीती
सगळ्यांच्या नोंदी होत्या त्या पत्रात
ओलसर होता कागद जरासा
वाळायला टेबलावर ठेवला
तर तो
पुन्हा नाव बनून गेलाय
पुन्हा पाऊस पडतोय
पुन्हा ओढा वाहतोय

आणि मी?
मी तसाच आहे स्थिर


वाहून जाणाऱ्या नावेकडं पाहत
मला पडलाय प्रश्न
माझ्या वाहण्याचं काय?


प्रमोद
१४ जुलै, २०२१

Thursday, 15 April 2021

तुकोबाचा क्रॅश कोर्स 


'संतपण सोप्पं असतं'
म्हणत होता तुकोबा
'सांग, काय लागतंय?
कुठली डिग्री नाही
कुठलं भांडवल नाही
संस्था नाही
ना मोट्ठी टीम.
आपलं आपलं संतपण

एक अवली मिळवायची पुण्याई तेवढी हवी
कुठल्या तरी जन्माची

आपलं आपण
एखादा वृक्ष
आणि चिपळ्या.
समजावत राहायचं
स्वतःचं नगण्यपण
स्वतःला

एकरूप होऊन जायचं.
सोSहमहंSसा

डसणाऱ्या इंगळीच्या
विषातही शोधायचं ईश्वरी सूत्र
सगळ्यांना जोडणारं

जे काही जाणवेल ते
गुणगुणत राहायचं
कुणी काढलं खरडून तर
सुखावायचं नाही
नाही काढलं
तर काळाच्या इंद्रायणीत
अर्पण करायचं

तुमच्या जिंवंतपणी
कुठल्याच माध्यमात
छापले जाणार नाहीयेत
तुमचे फोटो
कुणीही ढुंकूनही बघणार नाही
तुमच्याकडे

पण स्वतःचं मीपण
विसर्जित करून
सुखानं राहायचं.
करायचा सोहळा
आपल्या कुणी नसण्याचा

काहीही होणार नाहीये
जग बदलवणारं तुमच्याकडून.
उलट जितके कमीतकमी
फेरबदल होतील
तितके करायचे जगाच्या व्यापात.

कुणाशीही स्पर्धा करता येईल
इतकं मोठठं व्हायचंच नाही
नगण्य व्हायचं'

तुका आपला चिपळी घेऊन
काही बाही बरळत राहिला
आम्ही सगळे हळू हळू
निघून चाललेलो

दूरवरून ऐकू येत होतं
म्हणत होता तुकोबा
'संतपण सोप्पं असतं'

Tuesday, 30 March 2021

गॅस चेंबर!


सगळीकडे होर्डिंग्स लागलेत
auschwitz गार्डन्सच्या
नवीन गेटेड कॉम्युनिटी
स्कीमचे

लोक संसार गाडीत भरून
auschwitz च्या बाहेर रांगा लाऊन
उभे आहेत
भांडतायेत आत शिरण्यासाठी

आत जातांना प्रत्येकाला मिळतोय
एक ultraclear resolution असलेला
टॅब
अन अनलिमिटेड डेटा

मग आत शिरलेली लोकं
बाहेरच पडत नाहीत

टॅबवर स्वर्गावरच्या documentary पाहात
तिथल्या आल्हाददायक हवे बद्दल
तिथल्या प्रदूषणरहित निसर्गाबद्दल
स्वप्नांचे इमले बांधत
वर्क फ्रॉम होम करत राहतात
प्रदूषित हवेत


त्यांना कळतच नाही त्यांना भूक लागलीये
कारण टॅबवर त्यांना तेच दिसत राहतात
अक्षय्य पात्रातून
पिझ्झे आणि बर्गर खातांना


ते दिसायला लागलेले असतात
कुपोषित, कुरूप रोगट
तेवढ्यात कोणीतरी
ओळखीच्या जाहिरातीतल्या सारखं दिसणारं
बेमालूम खोटं हसत
हातात देतं आमंत्रण
जंगी पार्टीचं


टॅबवर जंगी पार्टी बघत
पार्टीत संध्याकाळी
सगळे खात राहतात शिळं पाकं काहीतरी
हिटलर त्यांच्याकडं बघत
किळसवाण्या नजरेनं पुटपुटतो
'हि जनावरं जगण्याच्या लायकीची नाहीत!'
रुबाबदार चालीने ऑपरेटर रूम मध्ये शिरत
कर्कश्य ओरडतो
'गॅस सुरु करा'


अस्ताव्यस्त देह पुरताना

प्रत्येक शव बघत असतं
आपल्या रिकाम्या हाताकडे
ज्यातला टॅब चकचकीत करून
नुकताच दिला गेलाय
auschwitz गार्डन्स मध्ये शिरलेल्या
नवीन रहिवाश्यांना
लाल फितीत गुंडाळून!


प्रमोद खाडिलकर

३० मार्च २०२१

Wednesday, 24 February 2021

वही


मी बसतो
दिवसाची पानं फाडत
आयुष्याच्या वहीतली

बरंचसं पान फाटतं
पण उरतंच थोडं
मधल्या शिवणीत
 
फाटायला तयार नसलेलं

सगळी पानं संपतील तेव्हा
उरेल ती वही मागं

मुख आणि मलपृष्ठाच्या
मधे
आयुष्य सोडायला नाकारणारे 
काही तुकडे

त्यात कुणाचं गाणं असेल,
कुणाची कविता,
कुठलंसं हसू, कुठलासा अश्रू
कुठलासा दृष्टांत
कुठलंसं पाप

कुणीतरी वाचत बसेल
त्यातून
मागं उरलेल्या
कपट्यातलं
माझं आयुष्य

प्रमोद
२४ फेब्रुवारी २०२१