Thursday, 25 July 2024

दहा स्वप्नं


मला आठवतंय,
नक्की!!
टिपून ठेवलंय मी,

मला दहा स्वप्नं पडली आहेत!

दहाच का?
१) दहा आकडा जरा जास्त पूर्ण वाटतो
२) माझं गणित कच्चय
३) लहानपणी मला नेहमी दहाचीच नोट सापडायची

तर मला दहा स्वप्नं पडली आहेत!

पुरावा?
दहाव्या स्वप्नात नोंद आहे
कि आधी मला नऊ स्वप्नं पडली आहेत

प्रत्येक स्वप्नात मला आठवतं
कि आधी मला पडली आहेत स्वप्नं
दहावं स्वप्नं सुरु झालं कि
मला आठवतं कि ह्या आधी
मला नऊ स्वप्नं पडली आहेत

नवव्यात आठवं,
आठव्यात सातवं ... ... ...

शेवटी मी पहिल्या स्वप्नात येऊन पोहोचतो
मग मी स्वप्नभर आठवत राहतो नुसता
कि माझं पाहिलं स्वप्न काय होतं?

आता मी दहाच्या वर
जाऊच देत नाहीये नोंदी
नुसत्या वह्या भरतात
शिल्लक शून्य असलेल्या.
ज्यात त्या वहीची किंमत
नोंदवायची राहून जाते

आता मी फक्त एवढंच सांगतो
मला दहा स्वप्नं पडली आहेत!

सकाळी हास्य गटात
कुणी हसत सांगतं,
अहो भरपूर स्वप्नं पाहावीत

मी सुद्धा अगदी
मनापासून भारावून जात
हसतच मान्य करतो ते

पण मग वाटतं,
आपल्या सामान्य कुवतीला
आधी ह्या दहा स्वप्नांचा
तिढा सोडवू द्यावा
आणि मग दौडावं
शंभराकडे

शेवटी सगळं तिथंच येऊन थांबतं!
माझं पहिलं स्वप्न!
ते आठवायचं बाकी आहे
फक्त

पण नोंदीप्रमाण सांगतो
मला दहा स्वप्नं पडली आहेत!

प्रमोद
२५ जुलै २०२४