Wednesday, 9 August 2017

एकटा



कर्कश्श रडणारं मूल अचानक शांत होतं ना अगदी तसाच रस्ता, अचानक, शांत झाला
तार स्वरात किंचाळणारी रिक्षा नाही ना टायरचा खरखराट, चालणं म्हणजे सुख झालं

मग मी सुद्धा माझ्या चालण्याचा वेग मंदावला, मंदावले श्वाससुद्धा. पाहिलं एखादा पक्षी दिसतोय का
किंवा माझ्याच मनात दडलेला एखादा रंगीबिरंगी पक्षी बोलतोय का काही माझ्याशी सगळं निश्चल असतांना

असा स्वतःच्या धुंदीत मग्न चालत असतांना समोर दिसला कुणाच्या तरी केसांतून सुटून पडलेला 'गजरा'

हलकेच उचलून घेतलं त्याला ओंजळीत, गजरा सुद्धा आक्रसून घेत स्वतःला कुशीत शिरला
जत्रेत आईचा हात सुटून मागं राहिलेल्या पोराला कुणीतरी मायेनं डोक्यावर हात फिरवून कुशीत घेतल्यावर,
भरल्या डोळ्यांनी ते पाहतं ना, तसाच काहीसा 'गजरा' माझ्याकडं पाहात राहिला

मी विचार केला, कोण आणि कशी असेल हि गजरा माळणारी?
असेल गोरीघारी का एवढीच हौसमौज परवडेल अशी गरीब कामकरी?
सकाळच्या गडबडीत खास थांबून घेतला असेल गजरा, का सिग्नलवर कुणी माथी मारला असेल?
का कुणी माळला असेल प्रेमानं आणि त्यानंतर एखादं चुंबन पाहून डोळे मिटून घेतले असतील ह्यानं?


सुंदर दरवळणारा मोगऱ्याचा सुवास एकदा छाती भरून घेणार इतक्यात थबकलो, वाटलं
गजऱ्याला चिकटला असेल गंध त्या केसांचाही,
कुठल्या अनोळखी पुरुषानं त्यांचा वास घेणं कदाचित आवडणार नाही कोणा 'ती'ला

कळेना काय करावं, आजूबाजूला पाहीलं तर शेजारीच पडलेला एक दगड शेंदूर फासलेला
वर्षांत कुणाला त्याच्यातल्या देवपणाची प्रचीती आलेली दिसत न्हवती, शेजारीच बसलेलं एक कुत्रं रोगट

देवावर तसा विश्वास नाही माझा, पण अविश्वास दाखवावा असंही काही केलेलं ऐकिवात न्हवतं
वाहला गजरा त्याच्या पायाशी, म्हणजे जिथे पाय असेल असं वाटलं तिथं. दगड निर्गुण निराकारपणाचं उदाहरण होता अगदी मूर्तीमंत

चालायला लागलो, एक दोनदा वळून पाहिलं, वाऱ्याच्या झुळूकेनं गजरा दगडाच्या खोबणीत जावून बसला
वाटलं चला, हे चांगलं झालं, दोघांचंही एकटेपण खुंटलं, राहतील दोघं सुखदुःखाच्या गप्पा करत

पाहा कसला कसला ऋणानुबंध असतो. त्या मागं पडलेल्या गजऱ्याला मदत करायला गेलो
तो निर्माल्य होवून मातीत मिसळलासुद्धा, त्या दगडाचं एकटेपण खूपायला लागलं म्हणून एक फुल मात्र वाहतोय रोज आठवणीनं . . .

- प्रमोद खाडिलकर

No comments:

Post a Comment