Wednesday, 9 August 2017

मरण 



रोजच्यासारखा वाहात होता रस्ता, 'मरण'घाई असलेल्या गाड्यांसोबत
मी, नेहमीसारखा मागं पडायच्या अट्टाहासानंच शर्यतीत उतरल्यासारखा, सायकलवर

काहीतरी वाजत होतं बहुतेक ear phones वर किंवा डोक्याच्या पोकळीत घुमत असेल विचारांचा पारवा, आठवत नाहीये
तेवढ्यात, अगदी शेजारून कार वेगात पुढं गेली फुटपाथच्या जवळ जात, आणि क्षणार्धात

क्षणार्धात अर्धवट उघडलेल्या काचेतून 'ती' फुटपाथवर फेकली गेली. थोडी फरफटून विसावली. धुराळाही उडाला नाही

मी विस्मयानं पुढं गेलो, नंबर टिपून घ्यायचा विचार मनात आला पण गाडीचा वेग विचारांपेक्षा थोडा जास्तच होता
वेदनांनी कळवळणाऱ्या तिच्या चेहऱ्याकडं जरा दुरूनच पाहात राहिलो
मी पाहातो आहे हे लक्षात आल्यावर तोंड लपवून रडत राहिली, हमसून हमसून

मी विचारलं, 'काय झालं इतकं टोकाचं वागण्यासारखं? कारकडे बघून तरी वाटतंय की वहीत आणि घरात जागा भरपूर असेल'

ती, 'आजकाल नुसता business channels बघत असतो, 'return on investment' फार चांगली नाहीये म्हणतो माझ्यावर'
'आता झालं आहे लग्न, त्यामुळं वाढदिवसाला platinum दिलंकी काम भागतंय
रसिक मित्रही पांगले आहेत आणि excel मध्ये फार छोटे रकाने असतात म्हणे कविता लिहायला'

मी, 'अगं वाटतं खूप लिहावसं पण वेळ नसतो. मी मात्र अर्धवट कविता जपून ठेवल्या आहेत हं , टाकल्या नाहीत अश्या'
एकदम तीटकाऱ्यानं माझ्याकडं पाहात ती म्हणाली, ' तू सुद्धा कवी आहेस वाटतं ?'


तिच्या भकास चेहेऱ्याकडं पाहून कसंतरीच वाटलं. कविता वाचनात घेतलेल्या टाळ्यांमुळं मदत करणं गरजेचं वाटलं
दिवसभराच्या, महिन्याच्या, वर्षाच्या कामाचा, अर्धवट कवितांचा हिशोब केला. सहानुभूतीनं विचारलं 'दत्तक घेऊ का तुला?'


कवीचं आणि गणिताचं तसं वाकडंच. चेहऱ्याची काळी कुळकुळीत पाटी होऊन जाते आणि ठळक अक्षरात दिसतात मनातले हिशोब


चेहेऱ्यावरचा हिशोब पाहून अनाथ मुलीसारखी हतबद्ध वाटणारी ती अचानक वृद्धाश्रमातल्या म्हातारीसारखी करारी, हट्टी झाली
'नको, कविता घेता येत नाहीत दत्तक, अनाथ मुलांसारख्या, अनाथ कवितांनी मरून जाणंच योग्य'

मी म्हणलं, 'मग थोडं पाणी वगैरे?' ती नुसती पाहात राहिली आकाशाकडं कोरड्या डोळ्यांनी.
मी एक उसासा सोडून मौन पाळलं एका मिनिटाचं. ओळखीच्यांना फोनही केला कवितेचे शेवटचे काही विधी असतात का ते विचारायला
मग जमा केल्या काही काड्या त्यावर ठेवला कवितेचा मृतदेह आणि पेटवून दिला साश्रू नयनांनी

सायकल हातात घेऊन चालत राहिलो जड पावलांनी, मधेच एकदा थांबून वळून पाहिलं

परत जाऊन उचलली थोडी राख, बांधून ठेवली पुडीत. वाटलं कुठंतरी विसर्जित करावी किंवा ठेऊन द्यावी नुसतीच, माझ्या अर्धवट कवितांचा विसर पडू नये म्हणून !

प्रमोद ( एप्रील २०१३)

No comments:

Post a Comment