Monday, 25 May 2020

दहा रुपयाची कविता !

पिक्चर बघायला गेलेला माझा मित्र
घरी परत आला
खुशीत असेल असं वाटलं तर
वैतागलेला निघाला

मी म्हंटलं, काय रे गड्या ?
पिक्चर एकदम बकवास होता का?
हिरोईन पूर्णवेळ साडीत आणि
पावसातल्या गाण्याचा एकही सीन न्हवता का ?

पिक्चर मस्तच होता रे
हिरोईनही एकदम झकास होती
शेजारच्या सीटवर चक्क मुलगी
ती पण अतिशय धमाल होती

पण घरी परतल्यावर कळलं
एक गडबड झाली
दहा रुपयाची नोट साली
गडबडीत कुठंतरी हरवली

शून्यात हरवून जात
तो पलंगावर बसला
स्वतःच्या गणितावरचा अविश्वास
हिशोब बनून कागदावर उतरला

दोन तीनदा बेरीज करून
हताशपणे तो बोलला
९०चाच बजेट होता यार,
दहाचा फुकट घाटा झाला

४५ तिकीट, २८ रिक्षा, १२ पेप्सी
आणि ५ विल्सचे झाले
बेरीज बरोब्बर ९०, मग
साले १० रुपये कुठं गेले

मी म्हंटलं, जाऊ दे रे,
दोन दिवस टपरीवर नाही जायचं
चार दोन सिग्रेटी कमी,
थोडं मुलींच्याकडं कमी बघायचं

पुन्हा सगळं आठवत तो
हताशपणे उठला
पॅन्ट घडी घालून ठेवताना
चारदा खिसा तपासला

'चार वाजले कि लेका,
रेडिओ नाही लावलास
आजच्या 'किशोर' स्पेशलसाठी
तू आज मॅटिनी टाकलास

त्यानंही लगेच रेडिओ लावला
पलपल दिलके पास गुणगुणू लागला

गाण्याच्या सुरुवातीला
वा झकास असं ऐकू यायचं
गाणं संपे पर्यंत
चेहेऱ्यावर गणित ओघळत असायचं

तेवढ्यात रेडिओचे सेल संपले
लगबगीनं तो आणायला उठला
'नेहमीचीच गाणी आहेत' म्हणत
हिरमुसून जागेवर बसला

थोड्यावेळाने बाहेरच्या झाडावर
कोकीळ साद घालू लागला
त्याला नेहमी साद घालणारा
विचारात होता गढलेला

काहीतरी आठवून तो
विजेसारखा आत धावला
आतून 'सापडली रे ' चा
जल्लोष ऐकू आला

चोरखिशात ठेवली होती
बाहेर येत म्हणाला
सेल आणतो म्हणत
धावत निघून गेला

सेल घेऊन आला
आणि किशोर स्पेशल संपला
कोकीळ बिचारा
एकटाच ओरडून हिरमुसला

मग मित्र मला पिक्चरची
स्टोरी सांगू लागला
शेजारच्या मुलीला कितीदा हात लागला
ते बोटावर मोजू लागला

मी सुद्धा चोरखिशाच्या महात्म्याची
मनात तारीफ करू लागलो
५ रुपयाचा किशोर आणि कोकीळ विसरून
५ रुपयाची उरलेली स्टोरी ऐकू लागलो


प्रमोद (२००० ते २००३ च्या दरम्यान)

Thursday, 7 May 2020

क्षण



कसा असतो
तो क्षण ?


जेव्हा जाग
बदलून कूस
होऊन जाते
नीज


हृदयातून

निघते एक
गुलाबी कळ
पडलेलो असतो
आपण प्रेमात


घनफळ

वाढते नकळत
दुःखांचेही
येवढे
कि टचकन
जातो ओघळून
अश्रू


तो क्षण,
ज्याआधी
कागद नुसताच
असतो कागद
अन मग्
बनून जातो
कविता


तो क्षण


प्रमोद
०७-०५-२०२०