चूक आणि बरोबरच्या खोल मुळाशी अस्तित्व असतं
राग, द्वेष आणि लढ्याच्या पुढं हसणं असतं
हो पण ते हसू
बुद्धाच्या ओठांच्या कडेला जमलेल्या अदृश्य हास्यासारखं हवं
विजयोन्मादाचं गडगडाटी हास्य नाही
सध्या बरोबर किंवा चूक हे बरोबर नाहीयेच
सध्या थांबणं महत्वाचं आहे
सगळ्यांनी शोधायला हवाय बोधिवृक्ष
आणि बुद्धाचं हसणं
थांबलं कि जाणवतं किती धावत होतो आपण
जाणवायला लागते झीज
थांबलं कि ठणकायला लागतात जखमा
स्वतःच्या पेक्षा, आपल्या तलवारीच्या पात्यावरच्या
दुसऱ्यांच्या शरीरावरच्या
थांबल्यावर दिसतं कि युद्धात
काहीच क्षती ना झालेला तिसरा पक्ष सुद्धा आहे
जो नेहमीच जिंकतो
जो युद्ध थांबल्यावरच दिसतो
धर्माच्या मागे चालणारा
प्रत्येकच नसतो
माणुसकीचा हितरक्षक
जसा न्हवता
कुरुक्षेत्रावर, युद्धाच्या अंती
युधिष्ठिराच्या मागे चालणारा
वजाबाक्यांच्या बेरजा चालू आहेत
त्यातल्या बेरजांची बाकी ऋणच असणार
फाडून टाकायला हव्या
सगळ्या हिशोबाच्या वह्या
कारण आपण नुसतं गणित करत सुटलोय
विसरलोय कि शेवटी बाकी राहायला हवीये
प्रमोद
१०/०१/२०२०