तिच्यापासून माझ्यापर्यंत तिनं एक सरळ रेषा मारायला घेतली आहे .......
कॉलेजात मी सांगायचो तिला कि गणित महत्वाचं आणि ती नेहमी कवितांत गुंतलेली
सोप्पी सरळ रेघ तिनं इंद्रधनुष्याच्या कमानीवरुन, पक्ष्यांच्या घरट्यांच्या शेजारून अशी कुठं कुठं फिरवून आणली तेव्हा,
तिला मदत म्हणून मग मीच धातूची सरळसोट पट्टी घेऊन मारत सुटलो रेषा
तिच्यापर्यंत पोहोचलो असं वाटेपर्यंतच ती कुठंतरी दूर भासायची, सरळ रेषेत
अशी अनेक तपं उलटल्यावर ती भेटली आणि संपली सरळ रेष
मोजल्यावर जाणवलं कि तिची सरळ नसलेली सरळ रेष माझ्या 'सरळ' सरळ रेषेपेक्षा छोटी आहे
मी भांडायच्या पावित्र्यात भुमितीची प्रमेयं मांडणार इतक्यात माझं एक चोरटं चुंबन घेत ती म्हणाली,
'ढ कुठला!'
प्रमोद
१७ मे २०१८