Wednesday, 9 August 2017

वेळ 



संध्याकाळी, मित्रांच्या रुमच्या दरवाज्याशी 'तो' बसला होता
मी म्हणालो 'काय झालं रे?', म्हणाला 'मला घालवतायेत'

आत गेलो, मित्र बुरसटलेल्या चेहेऱ्याने काहीबाही करत होते
'जाम कंटाळा आलाय यार' एक जण म्हणाला
मी चपापून बघितलं तर कंटाळा सोफ्यावर बसून तिरकस हसत होता

म्हणालो 'चला रे, एक मस्त match खेळू, कट्ट्यावर जाऊन बसू'
कुणी उठणार तेवढ्यात कंटाळा त्याच्या मानगुटीवर जाऊन बसला

जाताना शेवटचा प्रयत्न म्हणून म्हणालो. ' असा वेळ घालवायचा नसतो. बिचारा कसा बसलाय बघा दरवाज्यात'
'अरे आम्ही बरे, काही लोकं तर मारतात वेळ. भयाण सिरिअल समोर किंवा अंधाऱ्या खोलीत laptop समोर बसवून. फार तडफडून मरतो बिचारा.‘

मी एक उसासा सोडून बाहेर पडलो

मला आठवलं लहानपणी एकदा बाबा म्हणालेले,
'वेळ घालवायचा नसतो असा कंटाळ्याला कवटाळून
त्यापेक्षा वेळेला पतंगाच्या शेपटीला चिटकवायचं, हे असं SSS
बघ वेळ कसा उडतोय आकाशात किंवा ठेऊन द्यायचं त्याला एखाद्या सुंदर पक्ष्याच्या पाठीवर भिरभिरत राहतो तो मग गाणं गात‘

मोठा झाल्यावर तोच वेळ मी उद्बत्तीबरोबर देवघरात पेटवून टाकतो,
प्रसन्नपणे दरवळत राहतो तो घरभर
कधी तंबोऱ्याच्या तारेवर बसवून टाकतो त्याला, अन कधी बागेतल्या घसरगुंडीवरून सोडून देतो
तिच्या रेशमी ओढणीवर सोडून देतो कधी, तिच्या मागं मागं लहरत राहतो तो, आणि मी सुद्धा

जाताना मित्रांच्या वेळेला हसवावं म्हणून म्हणालो
'व्यायाम करा म्हणल्यावर म्हणतात वेळ नाही आणि आता…….
…… तुला साठवायला एखादी बँक असायला हवी होती
मग साठवून तुला हवं तसं वापरता आलं असतं‘

तो म्हणाला, ' साठवणं तसं अनैसर्गिकच
तिथे स्विस बँकेत कुजतोय पैसा, आणि चिमणी पोरं उपाशी रडतायत
वेळ म्हणलं तर माध्यम आहे म्हणलं तर अंत
म्हणलं तर सर्कशीतला विदूषक किंवा देव्हाऱ्यातला भगवंत

झालंय असं की माणसांना प्रत्येक गोष्टीची व्याख्या लागते
लागतात प्रत्येक गोष्टीच्या काटेकोर परिसीमा
मी आहेच अनादी अनंत, येत नाही छोट्याश्या मेंदूच्या आवाक्यात
मग माझं अस्तित्वच नाकारलं जातं………।

जाऊ दे, बोलू कधीतरी 'वेळ ' मिळाला तर, आत्ता तुझा वेळ तुझी वाट पाहातोय
त्याच्यावर अन्याय नको

मी माझ्या वेळेकडं बघून हसलो, तो सुद्धा'
'आज तुझ्या नावा करून सोडणार आहे मी समुद्राच्या लाटांवर,
झकास मजा येईल'

आम्ही हसत दारात बसलेल्या मित्रांच्या वेळेकडं बघितलं
त्याच्या चेहेऱ्यावर नव्हता विषाद, तो सुद्धा हसत होता, दिसत होता ऋषी 'निष्काम कर्म' करणारा


प्रमोद (कधीतरी २०१४ साली)

No comments:

Post a Comment