Monday, 27 April 2026

स्पॅम


मला मिळाला आहे तिचा फोन नंबर
पण मी खूप खुश असल्याचा आव आणत,
'खुश खबर! तुम्हाला १० लाखाचं preapproved कर्ज मंजूर झालंय!!!!'
म्हणत जे फोन करतो
त्यातल्या कोणीतरी
स्पॅम मध्ये टाकलंय मला Truecaller वर

स्पॅम म्हणून आलेल्या फोनवर
'मला तू खूप आवडतेस' असं सांगितल्यावर
ती ऐकून तरी घेईल का?
का काही न ऐकताच,  
'I am not interested?'
म्हणत कट करून टाकेल?
का करेल एक क्षण विचार
हा कोणी chatbot होऊन गेलेला मनुष्य bot नसून असेल
खरा खुरा जिवंत माणूस

माझ्याकडं नाहीये मोठी लिस्टहि नाहीये
ज्यात तिच्या सारख्या अनेकींचे
नंबर लिहिलेले असतील

नवीन घेतलेल्या नंबरवरून
आता फोन करतोय तिला  
टाकलाय तिचा नंबर कीपॅड वर,
फोन लावतांना उगाच
सवयीप्रमाणे, उफाळून येतोय,
तो खोटा आनंद
स्पॅम कॉल करतांना असतो तसा  
जमा होतायेत तोंडात शब्द
'खुश खबर! हाच तो क्षण जेव्हा तुम्हाला मिळाली आहे तुमच्या आयुष्यातली खरी खुरी प्रीती!'

मी सांगतोय स्वतःला
हे नाहीये तसं,
ह्या दुविधेत असतांनाच
ती उचलते फोन
मी स्तब्ध होऊन जातो काही क्षण
'हॅलो, हॅलो..... कोण बोलतंय?'
तिला ऐकू जात असतील माझे
भरकटणारे श्वास,
छातीतली धडधडही ....
पाठीमागून दुसऱ्याच कोणाचा तरी
ऐकू येतोय आवाज
'कट करून टाक गं, स्पॅम असेल'
ती ऐकत राहाते, नीट
'नाही, इथं कुणीतरी, काहीतरी
......... खरंय'
ती नुसतं ऐकत राहते

मी घेत राहतो नुसते श्वास!   

Friday, 13 February 2026

अमूर्त (abstract)

 

काही उत्तरं असतात
ज्यांचे सापडलेले नसतात
प्रश्न

प्रश्न पडण्याचे तोटे असतात
कारण मन शोधत राहतं
उत्तरं

पण त्या कल्लोळाचा
पुढे निघून गेलं
कि वाटतं आपण
निबर कि काय होऊन गेलो आहोत

त्या प्रश्नांचा,
त्याला जोडलेल्या संवेदनांचा
काला
लगदा
गुंता
पडून राहिलेला असतो
एखाद्या हरीण गिळलेल्या
अजगरासारखा

आणि तो अजगर
झोपून राहतो
झोपूनच राहतो
अगदी किळस यावी
राग यावा
इतका वेळ
गच्च डोळे मिटून

आणि
मग एक दिवस

त्या अजगराच्या पोटातून
उडायला लागतात
अनेक रंगीबेरंगी
फुलपाखरं

जी खेचून आणतात
आकाशात इंद्रधनू
किंवा
काळ्या यमुनेत
कालिया
काळा कुट्ट

समोर कागदावर
उमटत राहतात

निरर्थक वाटणारे
फराटे
रंग मिसळले जातात
अधाश्यासारखे
जसं कि
सहा महिने झोपलेला
कुंभकर्ण
रिकामी करतोय
अन्नाची भांडी
आणि
एखादा योगी
अनुभवतोय
अद्वैत अवस्था

अश्या घाईने
जश्या घाईने
प्रियकर घेतो प्रेयसीला मिठीत
किंवा हाय वे वरच्या
भरगाव गाडीतल्या  
एखाद्याला
मृत्यू झटकन टाकतो
गिळून  

मग
उतरतं
कागदावर  
एक उत्तर
ज्याचा प्रश्न
हरवलेला असतो

मग प्रत्येक
उत्तर वाचणारा
बनवत राहतो
प्रश्नपत्रिका

जो तो कलाकार
कधीच
नसतो
तपासणार

प्रमोद खाडिलकर
 १३ फेब्रुवारी २०२६

Friday, 21 February 2025

तू खुप सुन्दर आहेस ......

वाटायचे तुला हे सांगावे तुला दर वेळी पाहतांना,

शब्द अनाहुतापने बोलून जायचे मी नुसता विचार करत रहाताना
आरसा प्रतिबिम्ब बनून म्हणाला असेलच तुला, तरी पुन्हा एकदा सांगतो
तू खुप सुन्दर आहेस, तू खुप सुन्दर आहेस

ठावुक आहे काय म्हणते प्रत्येक प्राजक्त फूल खाली पडतांना
स्पर्श व्हावा त्यांना तुझ्या हातांचा देवाची फुले वेचताना,
वहायाच्या आधीच निर्माल्य झालेल ते फूल म्हणाले असेलच तुला, तरी पुन्हा एकदा सांगतो
तू खुप सुन्दर आहेस, तू खुप सुन्दर आहेस

ठावुक आहे काय म्हणते ते फूलपाखरू अखंड पणे उडताना
स्पर्शावे एकदातरी तुझ्या मखमली गालांना तुझ्याभोवती बाग़डताना
फूलपाखरू फूलाच्या कानात काय कुजबुजले असेल ते कळलच तुला , तरी पुन्हा एकदा सांगतो

तू खुप सुन्दर आहेस, तू खुप सुन्दर आहेस

ठावुक आहे काय म्हणतो वारा पडदा सारून खोलीत शिरताना

भरून घेवुदे श्वासांत गंध, तुझे रेशमी केस विसकटताना ,
कळालच असेल वाऱ्याने घातलेल्या शीळेचा अर्थ तुला, तरी पुन्हा एकदा सांगतो
तू खुप सुन्दर आहेस, तू खुप सुन्दर आहेस

ठावुक आहे काय म्हणते गुलाबाची कळी खिडकीतुन डोकावताना,

फक्त तूच पाहावेस तुझ्या सुन्दर डोळ्यांनी तिला उमलताना,
नंतर गळनारी प्रत्येक पाकाळी म्हनालीच असेल तुला, तरी पुन्हा एकदा सांगतो

तू खुप सुन्दर आहेस, तू खुप सुन्दर आहेस

कदाचित येत असेल कंटाळा तुला, कारण प्रत्येक नजर तुझ्याकडे आपोआप वळत असेल,
कुणीतरी तुझ्यावर उगाच जळत असेल,
पण त्यांना तरी कसा दोष द्यायचा, प्रत्येकाचे सांगायचे माध्यम वेगळे,तरी प्रत्येक जण हेच म्हणत असेल,
तू खुप सुन्दर आहेस, तू खुप सुन्दर आहेस

- प्रमोद खाडिलकर

Tuesday, 31 December 2024

प्रवासी


आयुष्याचे प्रश्न सोडवताना
मी निघतो
कधी आत जातो
तर कधी बाहेर
स्वतःच्या

आत गेलो तर
तळ सापडत नाही
बाहेर गेलो तर
अवकाश संपत नाही

उरते फक्त
भीती
अधांतरी असण्याची

मग मी
स्वतःलाच कवटाळून बसतो
लहान मूल जसं कवटाळतं
आपल्या खेळण्याला तसं

पण मला निघावं लागणार आहे
आत किंवा बाहेर
ते खेळणं झुडकारून

अनुभवावा लागणार आहे
पोटात उठणारा गोळा
स्वतःला सोडून
खोल अज्ञाताच्या काळोखात
मुक्त कोसळण्याचा
किंवा मुक्त उड्डाणाचा

जेव्हा शरीराचे
स्पर्श
गंध
आठवणी
धूसर होत जातील

आणि मी उरेन
फक्त प्रवासी
अनंताचा


प्रमोद
३१ डिसेंबर २०२४

Thursday, 21 November 2024

हिशोब



हिशोबाचे कागद हरवतात!
हिशोबाला जितकं महत्व देतो आपण
तितकंसं त्या कागदांना देत नाही
मग कागद हरवतात,
अन हिशोबही
नाही नाही!
कागद सपशेल हरवतात
पण हिशोब पूर्ण हरवत नाहीतच


कुठल्या कुठल्या नोंदी
आठवत राहतात फक्त
शेवटची शिल्लक सुद्धा आठवते
ठळक
पण हरवलेला हिशोब लागत नाही


अगदी आठवल्या नोंदी सगळ्या
तरी शेवटी शिल्लक नेमकी वेगळी येते
मग कळत नाही
चूक तेव्हा झाली होती
का आत्ता झालीये?
नोंदी आठवण्यात


एकदा हिशोबाचा कागद हरवला
कि हिशोब हरवतोच नक्की
काही कमी, जास्त हरवतं
काही कमी, जास्त सापडतं
हिशोब हरवतोच
हिशोबाच्या कागदासोबत


प्रमोद
१० नोव्हेंबर २०२४

Wednesday, 18 September 2024

नातं

नातं 

एकदा मी कुठल्याश्या दुःखाला
मांडीत घेऊन बसलो होतो
एकटाच
आडवळणावरच्या बाकावर


ते दुःखही शांत बसून राहिलं होतं
एखादं तान्हं मुल अचानक
तंद्री लागल्यावर शांत बसून राहातं
तसं


त्याच्या रेशमी जावळावरून
हात फिरवत होतो नुसताच

खरं तर
सोडून येणार होतो त्याला
वाटत होतं
फेडलंय त्याचं ऋण
मागच्या काही रात्री जागून


त्याला हलकेच ठेऊन दिलं
बाकावर
कोणी बघत नाही ना
ह्याचा अंदाज घेत
फिरलो


पण जाणवलं
ते शांत झोपी गेलंय


भर भर पावलं उचलत निघालो
पण
माघारी फिरून
उचलून घेतलं
नाजूकपणे छातीला कवटाळून
घरी घेऊन आलो
त्याचं आणि माझं नातं असेल कदाचित
कुठल्या जन्मीचं


प्रमोद
१७ सप्टेंबर २०२४

Tuesday, 17 September 2024

टाईम ट्रॅव्हल


टाईम ट्रॅव्हल करून
मी भविष्यकाळात गेलो

मला
भविष्यकाळात लिहिलेली
माझी एखादी
कविता हवी होती

मला वाटलं
ती आजची म्हणून खपवली तर
कालातीत वगैरे वाटेल
आज किंवा भविष्यात वगैरे

पोहोचलो भविष्यकाळात
तर सगळं जग संपून गेलेलं

मागे उरलेल्या
कचऱ्याच्या ढिगात शोधली कविता
आधी माझी

मग कुणाचीही
वाटलं कुणाला कळणार आहे

पण सापडली नाही
एकही कविता

पण,
अगदी निघताना
दिसला
(Sustainability) शाश्वततेचा पुरस्कर्ता असल्याने
मी अनेक दिवस वापरलेला
भणंग झालेला
(Sustainable) शाश्वत!

माझा टूथब्रश


प्रमोद
१७ सप्टेंबर २०२४