आवरून ठेवले आहेत नात्यांचे विस्तार
इकडच्या तिकडच्या account मधल्या रकमा गोळा करून
वाटून झाल्या आहेत
सगळे निरोप घेऊन झालेत,
एखादा गंभीर,
एखादा सगळ्यावर कोटी करून हसून हसून डोळ्याच्या कडा ओला करणारा
बरेच क्षण संपूच नयेत असे वाटणारे, तिच्यासोबत
तिनं माझ्या छातीवर डोकं ठेवलेला, एखादा तिच्या केसात रेंगाळणारा,
एखादा स्तब्ध, अबोल. भैरवीच्या स्वरांसारखा वर्तुळाकार, स्वतःतच गुंतलेला
सगळे निरोप घेऊन झालेत… . . . . .
कोण?
अरे, ये...ये ना प्रेषिता, ये ये ......
काय? दोन? फक्त दोन?
सगळे निरोप घेऊन झाले होते
पण पुन्हा ……
पुन्हा मोठ्ठा पसारा मांडून बसलो आहे
अचानक जाणवतंय स्वतःचं निर्मोहीपणाचं ढोंग
निर्णयापेक्षा त्यामागचे निकष ठरवणंच जास्त अवघड असतं
आता गोळा करत आणलेलं सगळं पुन्हा पसरत चाललंय
सगळ्या सुगंधी कुप्या, मखमली कापडातल्या पोथ्या,
बोहारणीला द्यायचे कपडे, प्रेमपत्रं, प्रशस्तीपत्रकं
फेकून द्यायच्या वस्तूंचा ढीग, अगदी स्मशानातली थडगी सुद्धा
सगळीच उलथापालथ,
उगाच काही तरी सांगितलं प्रेषितानं अगदी निघतांना
महाप्रवासाला निघण्या आधी म्हणे कुठल्याही दोन, फक्तं दोन वस्तू घेता येतील म्हणून
नेमक्या कुठल्या दोन वस्तू घ्यायच्या हे ठरवणं वरकरणी किती सोप्पं वाटतं,
निर्णयापेक्षा त्यामागचे निकष ठरवणंच जास्त अवघड असतं!
प्रमोद (१५ सप्टेंबर २०१५)
No comments:
Post a Comment