Tuesday, 23 October 2018

उगवेन!

उगवेन!

हं ...... झाला का? अंदाजे ६ बाय ३ चा बास होईल
खोली? ठेवा एक ५-६ फूट.......

हळू हळू सोडा आत.....
टाका आता माती वरून ........

किती वेळ खेळताय? घ्या फावडं.
टाका भसाभस.....

पूर्ण पुरून टाका.....
अरे रडताय काय?

मेल्यावरच पुरतात असं थोडीच आहे
रुजायला सुद्धा पुरावंच लागतं
बीज आहे माझ्यात.
उगवेनच काळजी नसावी.

उगवल्यावर सापडेनच
उगाच शोधू नका

कुठून उगवून येईन ह्याचा काही भरवसा नाही
अंधारसुद्धा किती सुंदर असतो, आईच्या गर्भासारखा.
काळोखाला कुठल्या दिशा. डुंबेन अमर्याद, मनसोक्त.
प्रकाशाची आस जेव्हा लागेल तेव्हा कुठं पोहोचलो असेन कुणास ठाऊक

बीज आहे माझ्यात.
उगवेनच काळजी नसावी.

विचार करू नका, टाका माती .....
टाका माती .....

प्रमोद
२३ ऑक्टोबर २०१८

Thursday, 17 May 2018


तिच्यापासून माझ्यापर्यंत तिनं एक सरळ रेषा मारायला घेतली आहे .......

कॉलेजात मी सांगायचो तिला कि गणित महत्वाचं आणि ती नेहमी कवितांत गुंतलेली

सोप्पी सरळ रेघ तिनं इंद्रधनुष्याच्या कमानीवरुन, पक्ष्यांच्या घरट्यांच्या शेजारून अशी कुठं कुठं फिरवून आणली तेव्हा,
तिला मदत म्हणून मग मीच धातूची सरळसोट पट्टी घेऊन मारत सुटलो रेषा

तिच्यापर्यंत पोहोचलो असं वाटेपर्यंतच ती कुठंतरी दूर भासायची, सरळ रेषेत
अशी अनेक तपं उलटल्यावर ती भेटली आणि संपली सरळ रेष

मोजल्यावर जाणवलं कि तिची सरळ नसलेली सरळ रेष माझ्या 'सरळ' सरळ रेषेपेक्षा छोटी आहे

मी भांडायच्या पावित्र्यात भुमितीची प्रमेयं मांडणार इतक्यात माझं एक चोरटं चुंबन घेत ती म्हणाली,
'ढ कुठला!'


प्रमोद
१७ मे २०१८   

Wednesday, 28 March 2018

दुक्ख!

'अजाण हायस ग पोरी, तुले समजायचंय समदं'
'टाकलंस कशापायी चुलीत दुक्ख? वाटलं व्हय कि जळून जाईल'


बघ झाला न्हवं ह्यो समदा धूर झोपड्भर'
'इवलंस दुक्ख आता आभाळभर झालं, न्हवं'
'रडवीत ऱ्हायील आता तुले दिसभर'
'आन सायंच्याला, बनलेली राख ताटलीत भरून टाकायला जाताना'
'नेमकि येईल हवा, आनी त्ये इवलंस दुक्ख जमीनभर होईल'
'पायाले लागून समदीकडं होईल, अगदी हंथरुनात जाईल'
'मंग दिवसासारख्या रात्रीबी ओल्या'


सांगितलं व्हतं तुला, ओलं दुक्ख जळत न्हाई'
त्याले वाळू द्यावं लागतं
टाकून द्यायाचं आयुष्याच्या उन्हात, चांगलं वाळू द्यायचं
छान रचून ठीवायची वाळलेली दुक्ख
मंग त्या दुक्खाला टाकायचं चुलीत, झकास भाकर थापायची
आणि एक्ल्यानं बसून खायची.
व्हतो थोडा धूर तवाबी, वहायची थोडी टिपूसं त्या दुक्खाचं देनं म्हणून.......


पोरी, हिकडं ये. ये गो माय. पूस डोळं.
पोरी, ह्ये समदं सांगायलाच तर आय अस्ते न्हवं.
उगी उगी रडू नकोस...... पर एक लक्षात ठिव
ओलं दुक्ख जळत न्हाई, ठार वाळू द्यावं त्याले
आणि इश्वास ठिव माजेवर,
केवढं भी आभाळभर दुक्ख असीनाका, त्ये वाळतच.
जगत रहावं माय, जगत रहावं


प्रमोद

२८ मार्च २०१८

Wednesday, 24 January 2018

एकांता


त्याचे माझ्याभोवती घुटमळणारे पाय आणि शरीरावर रेंगाळणारे स्पर्श घेऊन तो निघून गेला आहे पुढं
तिचे दुडूदुडू धावणारे इवलेसे पाय, त्यांचा वेग. थकून जाते मागे धावून आणि थांबते. एकटीच

मग तू येतोस मागून आणि मिटतोस डोळे.
जाणवत असेल तुला माझ्या पापण्यांवरचा ओलावा पण तरी

मी दूर लोटते तुला तरी तू तसेच डोळे घट्ट मिटून उभा राहतोस
अगदी लहान मुलीसारखी भांडते मी तुझ्याशी, पण तू आपले डोळे मिटलेलेसच

मग हतबल होऊन मी झोकून देते माझ्या स्त्रीत्वाचा भार तुझ्या खांद्यावर
आणि मग तू हळू हळू सोडतोस माझे डोळे मला आरश्यासमोर उभी करून

सोडतोस माझे केस माझ्या शुष्क ओठांवर अंथरतोस मखमली श्वास
आणि सोडून जातोस अश्रूच्या मोत्यासारखी चमक त्यांच्यावर

भरून उरतोस माझ्या गात्रागात्रात, तुझ्यावर चिडते मी, रागावते आणि मग तुझ्याच पाशात उरते रात्रभर
खूप कष्टानी झोप लागल्यावर दचकून उठल्यावरही तू असतोस माझ्यावर पसरलेला त्या अंधारासारखा

हे एकांता. तू नको आहेस मला. पण भीती वाटते तू सुद्धा गेलास तर काय उरेल मागं.
एकांता तू जाऊ नकोस. जाऊ नकोस.

प्रमोद (२३ जानेवारी २०१८)

कवीकल्पना


तिचं शरीर वर्णणारी माझी पौगंडावस्थेतली कविता जप्त झाली
फाडून टाकली गेली आणि मानली गेली माझ्या चारित्र्यावरचा काळा डाग
तिच्या स्तनाच्या उभारीवर मी वर्णलेल्या तिळासारखी

कुणी विचारलं कवितेचा प्रवास तिच्या शरीराच्या वर्णनातच संपला?
का पुढेसुद्धा पोहोचला? आणि माझा?

अचंबित मित्रांनी विचारलं कुठं भेटली अशी ती निर्वस्त्र, कुठल्या रेड लाईट मधे?
शोधत राहिले माझ्या प्रत्येक मैत्रिणीत, कवितेच्या पुढचा कौमार्यभंग

वर्णलेल्या तिच्या नितंबांच्या गोलाईसारखी फिरत राहिली ती खाजगी वाचनात
पण कवितांच्या मैफिलींमध्ये मला बोलावणं बंद झालं

असाच एका अंधाऱ्या गल्लीतून चालतांना कुणी ती आली समोर
दिसला नाही चेहेरा पण कवितेच्या बांध्यावरच घाटलेला तिचा बांधा

तिला निरखून पाहायचा प्रयत्न केल्यावर तिनं झाकले माझे डोळे
वाटलं झोपेविना कोरड्याखट्ट डोळ्यांवर जणू चंद्रच उतरला

तिनं टेकवले तिचे तप्त ओठ माझ्या ओठांवर आणि तसेच माझ्या कानांपर्यंत नेत म्हणाली,
'मला पाहिलंच आहेस तू निर्वस्त्र तर लाज कसली....... पण कवितेत विसरला आहेस लिहायचं कि स्तनाच्या उभारीवरचा तीळ नक्की कुठं आहे ते'
'उद्या गोंदवून घ्यायला जाणार आहे मी. आवडली मला तुझी ती कवीकल्पना !'


प्रमोद (३० डिसेंबर २०१७)

पुरस्कार


कवितेच्या अर्थगर्भाला गोंजारत
पोहोचलो शेवटच्या ओळीपर्यंत

लहानपणी परवचे म्हणून झाल्यावर जसं काही अगम्य शांत जाणवायचं
तसंच शांत पाहिलं आईकडं. तिचे डोळे पाणावलेले

तिचे सुरकुतलेले हात फिरले केसातून, थरथरत
हसून म्हणाली , 'छान आहे!'
देवासमोर तेवणाऱ्या निरांजना सारखी तृप्तता तिच्या डोळ्यात
ती म्हणाली,' थांब, छान शिरा करते!'

शर्टच्या बाह्या वर करून शोकेस मधले सगळे पुरस्कार रिते केले
आणि त्यासोबत जोपासलेले काही गंड
आणि माळ्यावर टाकून दिले.

आईला म्हणालो,
'आई भरपूर तूप घाल गं शिऱ्यात'

प्रमोद
१३ ऑकटोबर २०१७