Wednesday, 13 September 2023

हरवणं


तो मुलगा निघालाय
हरवायला
निरागस आहे तो
त्याला सोप्पं वाटतंय
हरवणं

जितक्या विभिन्न दिशांना
भरकटता येईल
तितका भरकटतो तो
त्याच्या निर्हेतुक फरफटीत
सगळ्यांना जाणवतोच हेतू
हरवण्याचा


कित्येकदा पळून गेलाय तो

पण दरवेळी सापडलाय

हरवल्यावर तो वागत राहतो
हरवल्यासारखाच सारखा


असाच एकदा सापडल्यावर
कुणी त्याला पकडून न्हेताना
तिथेच बसलेला साधू म्हणाला
"हरवण्यासाठी सापडणं कळायला हवं
हरवणं हा स्थायीभाव व्हायला हवा
सापडलेलो असतानाचा असतो तसा

मग तो सापडणं शोधायला लागला

आणि मग एक दिवस
त्याच्या ओळखीच्या भवतालातच
हरवला
कुणीच शोधू शकत नाहीये त्याला
त्याच्या इच्छेविरुद्ध


प्रमोद 
१९ एप्रिल २०२३

मातीचा गोळा

मातीचा गोळा

पुरेसा मनुष्य होणं सुद्धा
जमलं नाहीये मला
अन देव बनवून
गाभाऱ्यात बसवताहेत ते मला


त्या कोणाला सांगतोय नाजूकपणे
कि अरे मी देव नाहीये
षड्रिपूंनी गांजलेला सामान्य
साधारण मनुष्य आहे


मला माहित आहे
कि खरी श्रद्धा पवित्र असते
म्हणून मी सुद्धा
उधळून मखर निघून जात नाहीये


मी बसतोय मूर्तीसारखा
देवघरात
मूर्ती म्हणजे देव नाही
हे माहित असल्याने


माझ्या देहाच्या मातीतून
एखादं रोपटं बहरलं
आणि खऱ्या ईश्वरापर्यंत
पोहोचलं तर


मी बसलोय तसाच मखरात
मूर्ती करायला ज्या मूर्तीकाराने
माझ्या देहाची माती निवडली
त्या मुर्तीकाराने आभार मानत


समोर हात जोडून उभ्या त्या कोणाची
मनापासून माफी मागत.


मातीचा गोळा.


मी एक शिक्षक आहे. गुरुपौर्णिमा किंवा शिक्षकदिनाच्या दिवशी अनेक विद्यार्थी आदर आणि प्रेमाने नमस्कार करतात, काही भेटवस्तू देतात. त्यांच्या डोळ्यात एक विश्वास दिसतो जो आनंददायी असतो आणि तितकाच अस्वस्थ करणारा असतो कारण ते माझ्यात देव शोधत असतात. मी अगदी प्रामाणिकपणे माझं काम करतोच आणि करत राहीन, पण मला माझ्यातलं मनुष्यपण अगदी ठळकपणे ठाऊक आहे. पण मी त्यांना निष्ठुरपणे माघारी पाठवत नाही किंवा कडवट शब्दात सांगत हि नाही कि मी मला देव बनवायच्या लायकीचा नाही. त्यांना माझ्यावर आंधळी श्रद्धा ठेऊ नका, माझ्या चुका मला दाखवून द्या वगैरे सांगतो, त्यांना प्रेमाने मिठी मारतो. कारण मला त्यांची श्रद्धा तोडायची नसते कारण चांगुलपणात श्रद्धा असणे महत्वाचे. त्यांचा भाव चांगुलपणाच्या भावनेतून असेल अशी श्रद्धा मी ठेवतो, ना कि माझे कौतुक करून माझ्याकडून भ्रष्टाचार करवून घेण्यासाठी. बाकी जे होईल ते ईश्वराच्या चरणी सादर आहेच.


प्रमोद
१३ सप्टेंबर २०२३