Tuesday, 12 March 2019

हिशोब

हिशोब

समोरच्याच्या बरोबरपणात स्वतःचं चुकलेपण का शोधतो आहे मी?
समोरच्याचं बरोबरपण हेही आपलंच बरोबरपण आणि
त्याचं चुकलेपण हे सुद्धा आपलंच बरोबरपण असा कोडगेपणा निपजला नाहीये अंगात

पण,
का शोधतो आहे, समोरच्याच्या बरोबरपणात स्वतःचं चुकलेपण?

ते त्याचं बरोबरपण आणि आपलं आपलं जे काही असेल ते, बरोबर, किंवा चूक

संशोधनानं कार्यकारणभाव ठासून भरला आहे विचारात
आणि वेदांतानं शिकवून ठेवलंय सोSहं...

सगळे धागे स्वतःतूनच सुरुवात करून स्वतःत संपवायची सवय लागलीये
सगळ्या जगाच्या निष्क्रियतेचं ओझं स्वतःच्या खांदयावर लादून घेतलंय

सारख्या कोर्टाच्या चकरा, स्वतः स्वतःची उलटतपासणी
स्वतःच विणलेली दोरी आणि स्वतःलाच फाशी

पालवी सारखं जन्माला येऊन गळून का जाता येत नाहीये
स्वतःच्या कोवळेपणाचेही सोहळे नको अन पिवळ्या जख्खपणाचं दुःखही

उन्मळून पडताना मनात नको यायला कुठलेच हिशोब, जन्माला येताना न्हवते तसे


प्रमोद
०८-०३-२०१९

No comments:

Post a Comment