Tuesday, 12 March 2019

भेटीच्या शक्यतेचं गर्भारपण!

भेटीच्या शक्यतेचं गर्भारपण!

तुझ्या भेटीच्या शक्यतेचं गर्भारपण खरं का खोटं कळेनासं झालंय
पण माझ्या शहाणपणावर विश्वास उरला नाहीये माझा,
तेवढाही नाही जेवढा मला तुझ्या येण्यावर आहे

कुण्या एकाच्या निरोपाच्या पत्रांतला कागद घेऊन मी शोधत फिरले होते दुकानं
विरहकविता लिहायला अगदी असाच कागद हवा म्हणत
दुकानदारानंही कापून घेतला होता एक तुकडा त्या कुणाची सही असलेला, सॅम्पल म्हणून
तेव्हा मैत्रीण किंचाळली होती 'वेडी आहेस का?'

सॅनिटरी पॅडची गादी करून झोपले होते नग्न. मासिक पाळीत
ती गादी लाऊन टाकली हॉलमध्ये फ्रेम करून
खाली कॅप्शन दिलं 'माझ्या स्त्रीत्वाचा मुक्तछंद'
तेव्हा खोली सोडावी लागली होती मला
पण खोली सोडायला लावायच्या आधी घरमालकाने
खोदून विचारलं होतं कि नक्की कसं साकारलं ते चित्रं
जाताना सहज विचारलं त्यानं, 'म्हणजे नेहमीच झोपतेस नग्न का ह्या चित्रापुरतं?'

मागच्या वेळी शेवटच्या लोकल मधल्या शेवटच्या पुरुषाचं
तूच समजून घेतलं होतं एक दीर्घ चुंबन
त्यानंतर किती तरी दिवस भेटत राहिलो आम्ही
तोही वाट पाहात राहायचा माझ्यासोबत तुझी
शेवटी त्यानं विचारलंच, कोण आहे तो? कसा दिसतो? कुठून येणार आहे?
मी शेवटच्या लोकलची वाट पाहात इतकंच म्हणाले होते, 'काय माहित'

प्रमोद
०७ मार्च २०१९

No comments:

Post a Comment