Tuesday, 12 March 2019

गिरणी

गिरणी

बाहेर पसरलेली बर्फाची पांढरी चादर बघून मला गावची पिठाची गिरणी आठवली. दुरूनच कळायचं गिरणी कुठं आहे ते. अगदी तिची घरघर बंद असली तरीही. दूरपासूनच पांढऱ्या पायघड्या घालून ठेवलेल्या असायच्या तिनं सगळ्यांच्या स्वागताला

आत गेल्यावर सगळीकडं फक्त पांढरा मुलामा सगळ्यावर. कधी तिथं काम करणारा छोटा पोरगा काही दुःख सांगत बसला तरी त्याच्या दुःखावरसुद्धा तो पांढरा मुलामा जाणवायचाच.
'काय चालूये?' म्हणल्यावर तोंडातली पिंक बाहेर टाकत गिरणीवाला म्हणायचा
'जवार आहे, गहू असल तर ठेवा, नंतरनं या'
पण मी नाही जायचो, मला ते पांढरं जग जादुई वाटायचं. गिरणीवाल्याच्या कानावरचे केस सुद्धा उठून दिसायचे पांढऱ्या रंगात.
एखादा यायचा ज्याला तिथं पसरलेल्या पांढराईचं काही वाटायचं नाही तो बिनधास्त बसायचा तिथं कट्ट्यावर. आरामात टेकायचा भिंतीला आणि जाताना फाडफाड कपडे झटकून निघून जायचा तशी ती पांढराई त्याला सोडून द्यायची. पण एखादा तो पांढरा रंग आपल्या कपड्याला लागेल, अंगाला लागेल म्हणून काळजी करत दूर जाऊन उभारायचा. तो जाताना नेमका कुठंतरी एखादा पांढरा चट्टा त्याच्या अंगावर उमटलेला दिसायचा. मला नेहमी वाटायचं कि तो चट्टा डोळे मिचकावून माझ्याकडं बघतो आहे. बायका दळायला आल्यावर पीठ बारीक झालंय का, पीठ गिरणीत राहत नाहीना ह्याची काळजी घेत चक्कीजवळच आयुष्याच्या गप्पा मारायच्या, पुरुष त्यांच्या नाकर्तेपणाला शोभेल असं काहीतरी देशाचं राजकारण किंवा अर्थकारण ह्यावर गप्पा मारत कट्ट्यावर निवांत बसायचे. एखादाच पुरुष असायचा जो नीट तपासून दळण घ्यायचा बाकीचे घरावर आणि बायकोवर उपकार करतो आहे अश्या अविर्भावात आलेले असायचे.

दळण झाल्यावर, निघताना कितीही झटकलं स्वतःला तरी थोडीशी गिरणी बरोबर यायचीच, शरीराच्या आणि मनाच्या सांधेकपारीत उरायची. घशात पिठाचं गोडपण जाणवत राहायचं बराचवेळ.

आज ह्या परदेशात गिरणी नाही ना तो गिरणीवाला. पण सगळा भवताल त्या पिठाच्या गिरणीसारखा. एका मोठ्या गिरणीत शिरल्या सारखं वाटत होतं.
समोर एक अजस्त्र निष्पर्ण झाड उभारलेलं. अंगाखांद्यावर पांढरा रंग ल्यालेलं.
एकदम त्याच्याकडं बघत ओरडलो, 'काय टाकलंय दळायला?'


प्रमोद
२८ नोव्हेंबर २०१८

No comments:

Post a Comment