Thursday, 18 June 2020

शुभ वार्ता! (सत्य घटने वर आधारित! :)

शुभ वार्ता! (सत्य घटने वर आधारित! :)

'शुभ वार्ता कळेल! असं भविष्य आहे तुझं आज' बायको फोनवर म्हणाली. मागच्या काही वर्षात पेपरमधे दैनंदिन भविष्य असं काही येतं हे आम्हाला कळलं होतं. त्या आधी भविष्य वगैरे बघायची तशी गरजच पडली न्हवती. आम्ही गम्मत म्हणून भविष्य बघायचो, चांगलं भविष्य असेल तर थोड्या गुदगुल्या व्हायच्या आणि वाईट असेल तर कपाळाला एखादी आठी. गुदगुल्या आणि आठी दोन्ही काही मिनिटांच्या वर टिकायचे नाही.
एक दोन दिवसांत माझ्या मोठ्या लेकीचा वाढदिवस होता. तिने आणि बायकोने वाढदिवसाच्या पेहरावाला matching hair-band, bow असं काही आणायचं असा बेत ठरवून, ते आणण्या साठी एक 'expert advisor' सुद्धा बोलावला होता. माझ्या मेव्हण्याची बायको (आता ह्या नात्याला नक्की काय म्हणतात ह्या बद्दल मी साशंक असल्याने असच लिहितोय). आम्ही तिघे घराजवळच्या दुकानात गेलो. माझी दुचाकी दुकाना बाहेर लावली. लेक आणि expert advisor आपलं काम चोख बजावत होते. बघता बघता दुकानातले अनेक डब्बे बाहेर निघाले. माझी लेक त्या दुकानदाराला 'ह्यांच्या कडं काही variety नाही' अश्या अर्थाचं घालून पाडून बोलल्याचं पण आठवतंय पुसटसं. काही वेळा पूर्वी पाऊस पडून गेल्याने वीज न्हवती, त्या मुळे पंखे बंद होते. दुकानातही काही 'विशेष' सुंदर गोष्टी न्हवत्या त्या मुळे मला सुद्धा काही थोडा कंटाळा आला होता. मी खरेदीत थोडी लुडबुड करायचा अयशस्वी प्रयत्न करून बघितला. पण माझ्या मुलीने, 'टळटळीत उन्हात रंग कळत नाहीत ह्याला आणि अंधारात हे matching होईल म्हणे' असे काही ताशेरे ओढायची चिन्हं दिसायला लागली म्हणून निमूट पणे बाजूला झालो. मग शेवटी खरेदी संपली आणि आम्ही बाहेर आलो.
जिथे गाडी लावली होती तिथे बघितलं तर गाडी तिथे न्हवती. शक्यतो गाडी लावायची जागा मी विसरत नाही, पण तरीही मी थोडा इकडे तिकडे बघून आलो. पण गाडी न्हवती. "गाडी नाहीये" मी चिंतातूर आवाजात म्हणालो. माझ्या लेकीचा पिंड लोण्याचा त्यामुळे तीने भोकाड पसरलं. मी दुकाना बाहेर उभारलेल्या दुकानातल्या विक्रेत्याला विचारलं, पण त्याला काही माहित न्हवतं. तेवढ्यात शेजारी उभारलेला अजून एक माणूस म्हणाला, 'कुठली गाडी होती तुमची? काळी activa ना? तमिळ नाडू पासिंग? आत्ताच एक मवाली दिसणारा माणूस घेवून गेला ती गाडी, चालू होत न्हवती म्हणून खटपट करत होता. मी विचारल्यावर म्हणाला चावी हरवली आहे. आत्ताच घेवून गेला. पोलीसांत तक्रार द्या, गेली तुमची गाडी चोरीला'. माझी लेक हे ऐकून विशेष तार स्वरात रडायला लागली. मग मी झटझट पावलं उचलत त्याने गाडी ज्या बाजूला गेली तिकडे गेलो.
तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला. लेकीने भोकाड पसरत आईला सगळी बातमी सांगितली. काय करावं ह्या विचारात मी पोलीस स्टेशन समोर येऊन पोहोचलो सुद्धा. पुन्हा बायको बरोबर बोलतांना विचार आला की कुणीतरी गाडी चुकून घेऊन गेला असेल'. लेकीला घरी पाठवून पुन्हा मी त्या दुकानासमोर आलो. विक्रेत्याला माझा फोन number देत म्हणालो 'कुणी तरी चुकून घेऊन गेलं असेल गाडी. वीज नसल्याने सगळा अंधार आहे. तो माणूस आणून देईल गाडी. असा कोणी माणूस आला तर कृपया मला फोन करा'. विक्रेता हे मानायला तयार न्हवता. तेवढ्यात जुनाट मळके कपडे घातलेला एक माणूस आमची गाडी ढकलत आणत होता. मी घाईने तिकडे गेलो. तो खूप विनंती करत म्हणाला, ' साहेब, गाडी न्हायची न्हवती मला, अंधारात कळलं नाही." शेजारीच लावलेल्या दुसऱ्या काळ्या रंगाच्या activaकडं हात दाखवत म्हणाला, 'हि आमच्या दुकान मालकाची गाडी आहे. माझ्या कडून खराब झाली असं वाटून घाबरून घेऊन गेलो ढकलत. मी चोर नाही साहेब.' मी त्याला मिठी मारली. म्हणालो, 'असू द्या असं होतं. मला गाडी मिळाली ह्यातच मला आनंद आहे' . मी प्रेमाने गाडीला न्याहाळलं. घाईने खिशातून फोन काढला आणि उत्साहात म्हणालो, 'शुभवार्ता आहे! ......... गाडी मिळाली।

No comments:

Post a Comment