Wednesday, 1 July 2020

व्यस्त


कृष्ण
निष्काम कर्माच्या
शिकवणुकीला अनुसरून
देत राहिला
धडका माझ्या
बंद दरवाज्यावर

तुका
गुणगुणत
चंद्रभागेवर तरंगत
गुंजी घालत राहिला
भोवताली

रामदास, सावरकर
विवेकानंद, गोनीदा
आणि
कुणी कुणी

मी मात्र
कॉन्फरेन्स मध्ये
माणसाकडे पाहण्यापेक्षा
गळ्यातल्या टॅगकडे पाहात राहतो
शेवटी
वहीत नोंदी करतो
माणसांची नव्हे तर
त्यांच्या affiliations ची
तसाच

तसाच
मी शोधत राहिलो
त्यांच्या गळ्यातले टॅग
कृष्ण, तुका.....
कोणीच न्हवते घातले
टॅग

मग मी बोलत राहिलो
इतरच कुणा कुणाशी
affiliations पाहून

हे सगळे
पोहोचू पाहत होते
माझ्यापर्यंत
त्यांना मिळत होतं
उत्तर
एकच

'ह्या मार्गावरच्या
सगळ्या लाईनी
व्यस्त आहेत"


प्रमोद
०१ जुलै २०२०

No comments:

Post a Comment