Thursday, 18 June 2020

जॉब प्रोफाईल!


(सादर करणारा माणूस अश्या प्रकारे बोलतो आहे जसा कि तो एखादा मार्केटिंग करणारा माणूस दरवाजा वाजवून दरवाज्यासमोर उभारून बोलतो आहे)
नमस्कार, अहो अहो एक मिनिट दरवाजा लाऊ नका (दरवाजा बंद होणार इतक्यात घाईने म्हणतो ) शेजारच्या पाटील वहिनी म्हणत होत्या तुम्ही कविता करता म्हणून (बंद होणारा दरवाजा हळू हळू उघडतो) नमस्कार , नमस्कार ... मी ... मी एक लेखनीक .... हो कारकूनहि म्हणालात तरी चालेल .... म्हणा ना .... कारकूनच ...नाही मी कुठल्याही ऑफिसचा कारकून नाही .... हो ... हो .... कवितेचं सुद्धा सांगतो .... जरा पाणी मिळेल का? (स्वतःच्या बॅगेतून एक फोल्डर काढतो, ज्यात वेगवेगळ्या कविता सुंदर अक्षरात आणि सुलेखनात लिहून ठेवलेलं आहे. पाण्याचा ग्लास घेता घेता तो फोल्डर समोरच्या व्यक्तीला देतो) बघा ना ..... हो मी लिहिलं आहे .... म्हणून म्हणालो लेखनिक....... म्हणजे काय आहे , मी काहीही लिहू शकतो. जो कोणी जे काही लिहायला सांगेल ते लिहितो, प्रेमपत्रापासून खंडणीचे पत्र असा विस्तार आहे लेखनप्रपंचाचा. हो पण कविता विशेष आवडतात मला लिहून काढायला...... नाही, कवीची निपुणता हा काही मुद्दा नाहीयेच ..... मला यमके, जुनके, चोर कवी आणि थोर कवी सगळे चालतात. पण चांगली कविता कळते. कविता आवडली तर अक्षराची साधी लिपीसुद्धा इतकी सुबक येते जसं कि आवडीचं कुणी येणार असलं कि साध्या पिठलं भाकरीला जशी पंच पक्वान्नांची सर येते तसंच.
अनुभव? तसा बराच आहे. अगदी मोठ्या उद्योगपतींपासून ते भिकाऱ्यापर्यंत सगळ्यांच्या कविता लिहून काढल्या आहेत. परवाच एका गृहिणीला सकाळच्या गडबडीत मुलाचा डबा बनवतांना कविता व्हायला लागल्या. म्हणत होती पीठाने ओट्यावर लिहून काढते. मग गेलो लगेच तिथे, हो हो .... तत्पर सेवा आहे आमची .... आणि हो .... anytime service सुद्धा. सगळं झालं व्यवस्थित, मुलगा वेळेत शाळेत गेला, डबा घेऊन. कवयित्री आणि कविता सुद्धा सुखरूप. छान महिरपीत गुंडाळून अशी हातात दिली, दृष्ट लागू नये म्हणून एक काळा ठिपका सुद्धा काढला कडेला. निवांत बसून चहा पिताना स्वतःची कविता वाचताना त्या माऊलीला बघून डोळ्यात टचकन पाणीच आलं अहो. आणि .... आणि कालच भिंत बांधायला सतराव्या मजल्यावर उभारलेल्या गवंड्याला कविता व्हायला लागली. मग ते पिवळं हेल्मेट घालून घोंघावणाऱ्या वाऱ्यात तिथं उभारून लिहून दिली. जाताना त्यानं हात हातात घेतला, कवीच्या दिसण्यावर कसं जायचं नसतं ते एकदम कळलं तेव्हा. म्हणलं त्याला बाबारे, हात इतके ओबडधोबड आणि कविता काय हळवी झालीये. त्यावर तो म्हणाला, 'शिमीट पण एकदम लोण्यासारखं असतं, त्याच्यावरच एवढ्या इमारती उभारत्यात' मग हसत गेला गर्वानं कविता छातीला लाऊन. हा पण त्याची कविता लिहिताना वाऱ्याच्या आवाजानं काही शब्द नीट ऐकू नाही आले, पण एकही स्वतःच्या पदरचा नाही घातला. सचोटीची फार गरज असते ह्या व्यवसायात.
काय म्हणालात? विश्वासार्हता?.... आता बघा इथे यायच्या आधी एका तरुणाकडे गेलो होतो. त्याची कविता होती प्रेयसीच्या पाठीवरच्या तीळावर केलेली. 'तुला रे बाबा कधी आणि कसा दिसला तो?' वगैरे चांभार चौकशा नाही केल्या बिलकून?
काय म्हणालात? कुठला तरुण? अहो विश्वासार्हता त्यालाच म्हणतात. कविता लिहून झाली कि कविता डब्यात बंद.
भाषा? होडॉक्टरेट आहे बऱ्याच भाषा येतात, बऱ्याच लिपी सुद्धा. हो पण मौनाच्या भाषेत डॉक्टरेट आहे माझी. हो रिझ्युम शेवटी आहे, वरून पाचवी ओळ. हं हं तीच. कविता सुचली कि मला बोलवायचं नुसतं, माझ्या शेजारी बसून राहिलात शांतपणे तरी सगळ्या मौनाचं भाषांतर करेन.
पैशाचं विचारताय? पैशाची तशी फार काही अपेक्षा नसते. आपलं पोटापाण्यापुरतं मिळालं तरी बास आहे.
श्रीमंतीचं वेड नाही हो आपल्याला. मेल्यावर ज्यांच्या कविता लिहून दिल्या त्यांनी तिलांजली द्यायला यावं एवढी माफक अपेक्षा.
नाही नाही हो, अहो डॉक्टर इंजिनियर सगळ्यांनाच नाही होता येत. लायकी न्हवती म्हणा ना, म्हणून म्हणलं जमतंय तेच करावं.
अहो नुसत्या मोटारी, बिल्डिंगी बांधून काय होणार? लोकांची मनं बांधायचं पण करावंच लागणार ना कुणाला तरी. ...
असो, मग आहे का काही लिहायचं काम? काय? नाहीये म्हणता! चालेल, लेखनीक आला म्हणून कविता थोडीच येणार आहे. अहो काही प्रॉब्लेम नाही. हो पण सुचलीच कविता एखादी तर जरूर बोलवा, हो त्या resume मध्ये माझा नंबर आहेच.
नाही नाही, अहो सॉरी म्हणायची काही गरज नाही, एवढा वेळ माझं ऐकून घेतलं हेही काही कमी नाही नाहीतर तोंडावर दरवाजा बंद व्हायची सवय आहेच.
बरं येतो येतो ...... अहो एक मिनिट तुमचे शेजारी कविता वगैरे? ... नाही म्हणताय? असू दे असू दे , प्रत्येकात थोडा कवी असतोच असं म्हणतात, काय सांगावं अचानक काही सुचलं तर आजच्या जेवणाची व्यवस्था होईल. बायको म्हणते कधी कधी वैतागून खा कविताच! (केविलवाणं हसत)
ठीक आहे कविता सुचली कि कळवा

No comments:

Post a Comment