दूर निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला
म्हातारी बसलेली
तीन दगडांची चूल मांडून
'आज्जे, कुठंशी चालली आहेस?'
तिनं पाहिलं माझ्याकडं
एक अथांग शांतता
गहिरं पूर्णत्व भरलेलं
डोळ्यात तिच्या
'बैस आधी चा पी'
म्हणत हात धरून बसवलं
फुर्र फुर्र करत चहा पीत राहिली
'आभाळाचा तुकडा हवाय'
'पेरणार हाय जिमिनीत माह्या'
मी दचकलो, हसलो, भेदरलो
'कुठं मिळणार आज्जे
आभाळाचा तुकडा?'
क्षितीजाकडं हात दाखवत
'त्ये काय तिथं
पोचेनच २-४ दिसात'
'आणि नाही म्हणालं आभाळ
तुकडा द्यायला तर?'
तोंडभर हसत म्हातारी म्हणाली,
'आभाळ मानूस हाय व्हय
लगीच काडून देईन बग'
'किती काळ झाला?
किती दिवस?
बाहेर पडून?'
'माह्या खिडकीतलं आभाळ
खाल्लं शेजारच्या भिंतीनं
तवापासून'
'अगं पण किती वर्षं झाली त्याला?'
'ते मोजायला येळ कोणाला हाय रं'
आणि मग आवराआवर करत राहिली
निघायच्या तयारीत
प्रमोद
०४-११-२०१९
No comments:
Post a Comment