Wednesday, 23 October 2019

फेसबुक


मोबाईल मध्ये आणि डेस्कटॉपवर प्रत्येकी एक
उघडं असतं फेसबुक
एकातून दुसऱ्यात करत असतो संचार
एकाच वेळी

ठेवत असतो
कडक पहारा स्वतःवरच

संकुचितपण जाणवू नये म्हणून एकातून दुसऱ्याला
करतो like, love, wow अधून मधून

आम्हा दोघात चिरंतन वाद आहेत
डेस्कटॉप म्हणत राहतो
साडेपाच इंच कितीसा विस्तृत विचार करू शकणार
मोबाईल
फ्रंट आणि बॅक कॅमेरा लागतो अनेकांगी विचारांना

डेस्कटॉपचं दिसणं मी वापरतो
पुरोगामी विचार मांडण्यासाठी, जाहीर
मोबाईलमध्ये नग्नता, व्यभिचार यांचं
सेवन करत राहतो
चेहेऱ्यावर सात्विक भाव ठेवत

फारच विसंवाद जाणवायला लागला
तर delete करून टाकतो कुठला तरी एक प्रोफाईल
सोयीस्कर रित्या
पुनर्जन्माचा रोमांच अनुभवतो फुकटात

फारच उदासीन वाटल्यावर
दोन प्रोफाईल वाटतात दोन आश्वासनं
विझत चाललेल्या अस्तित्वाला दिलेली


हवे तेव्हा मोजतो हवे तिथले likes
बघत राहतो प्रोफाईल जिथं
माझे होतायेत सत्कार

परवा,
अचानक मरून गेलेल्या मित्राच्या
वाढदिवसाचं नोटिफिकेशन आलं
डेस्कटॉपवर आणि मोबाईलवर सुद्धा
आणि मग खूप वेळ गेला माझा
शोधण्यात
मी कुठं नक्की जिवंत आहे ते
डेस्कटॉपवर? मोबाईलवर? का कुठं?

प्रमोद
२३ ऑक्टोबर २०१९

No comments:

Post a Comment