Wednesday, 22 May 2019

सेल्फी!


ती म्हणाली, 'मी उद्या बिलकुल रडणार नाहीये'
मला वाटलं ती उद्याचं रडू आज प्रिपोन करतीये

उद्याच्या फोटोत ती हसत असतांना दिसेल, निखळ
पण मला कळलंच न्हवतं कधी शिकली ती फोटोशॉप

हसऱ्या सेल्फीतला चेहेरा काढून
उद्याच्या फोटोत बेमालूम जोडून टाकते ती

मग काढून बसलो आमचे सगळे अल्बम
सगळ्या फोटोत हसणारी ती बघून थोडी शंकाच आली

मग मी निरखून पाहू लागलो कि तिनं फोटोशॉप तर केले नाहीयेत ना ते?
किंवा, मग तिच्या सामानात शोधू लागलो त्या सेल्फीचे अवशेष
ज्यात तिच्या चेहेऱ्याच्या जागी असतील शुभ्र विवरं

म्हणलं, त्या विवरातून सापडेल तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाचा तळ
किंवा तिनं बुडवून टाकलेल्या स्वप्नांचे गंजलेले अवशेष आणि काही अंधारे डोह

पाहात राहिलो बऱ्याच काळ तिच्या हसऱ्या फोटोकडे

प्रमोद
२२ मे २०१९

No comments:

Post a Comment