वऱ्हांड्यातून तो रोज पाहायचा तीला येता-जाता, अंगणातल्या गुलमोहरासोबत
प्रेमाचा स्वीकार सुद्धा गुलमोहराने घातलेल्या लाल पायघड्यांवर
तिच्या मोतिया देहावर त्यानं पेरले गुलमोहराच्या फुलांचेच निखारे
कित्येकदा पाहिले आहेत त्यांचे एकमेकांना बिलगलेले देह चंद्राने गुलमोहराच्या फांद्यांतून
शेजारच्या बंगल्यातल्या आजींचा एकांतातच शरीर सोडून निघालेला आत्मा
गुलमोहराच्या फांद्यांवरच विसावला होता शेवटचा, अनंताच्या प्रवासाच्या आधी
गुलमोहराच्या तिरक्या खोडाच्या आडोश्यात व्यायली आहे कुत्री
पिल्लांना पावसाच्या झोडपण्यापासून वाचवत
गुलमोहरा कुठे आहेत तुझे डोळे, तुझे हात, तुझं काळीज
आणि कुठे आहे तुझी गीता, कुठल्या भाषेत ..... गुलमोहरा
प्रमोद
२४ जून २०१७
बंगळुरू
No comments:
Post a Comment