Friday, 10 May 2019

यान


मला सिद्ध करायचं आहे कि 'मी' आहे

मी बदलतोय स्वतःची रचना.
स्वतःला इतरांच्या पासून वेगळं करण्यासाठी
दुर्बिणीला मला शोधता यावं म्हणून

आता त्या दुर्बिणीत फक्त भरायचे बाकी आहे
माझे वेगळेपणाचे गुणधर्म

तो कोणीतरी, अश्याच कुठल्याश्या यंत्रांच्या ब्लू प्रिंट वर झोपलेला
हसत बघतोय माझ्याकडे
म्हणतोय कि सुरु व्हायच्या आधीच फसलेला आहे माझा हा प्रकल्प
म्हणे एकदा तो गुणधर्म सापडला कि आपोआपच हरवून जातील यानाच्या किल्ल्या
आणि दुर्बिणीची भिंगं देऊन टाकावी लागतील नासाला,
कारण ती फार मोठ्ठी असतील आत्म्याला लावायला

मी लक्ष देत नाहीये त्याच्याकडं.
सध्यातरी स्वतःला अंतराळात पाठवण्यासाठी मोठ्ठ यान बांधतोय मी
तिथून स्वतःला शोधण्यासाठी अंतराळात एक मोठ्ठी दुर्बीण सुद्दा

प्रमोद
१० मे २०१९
डेन्मार्क

No comments:

Post a Comment