छातीच्या मधल्या घळीतून वाहत असतो एखादा घामाचा थेंब,
घाम जो फक्त तुमचाय आणि जाणवतोय फक्त तुम्हाला
समोरचा अनभिज्ञ सांगत असतो किती प्रफुल्लित दिसताय तुम्ही ते
घाम वाहतांना त्वचेच्या प्रत्येक पेशीला बिलगून देत असतो निरोप
शिष्टाचाराच्या अनिवार्यतेत तुम्ही जपत असता चेहऱ्यावरचं कृत्रिम हसू
आणि देतही नाही त्याच्या निरोपाची साधी पोच
तो घाम लहानपणीच्या मित्राच्या घामात जाऊन मिसळतो
तो घाम जो आपल्याला सायकलवर मागे बसवून शाळेत घेऊन जाताना निघालाय
आईला पोळी भाजताना लागलेल्या चटक्याच्यावेळी तिच्या तोंडातून निघालेला उद्गार
माझा डबाभरून झाल्यावर तिने तिथेच न्हेऊन सोडला असेल
घाईत एखादी राहिलेली मिठी, परत करायचे राहिलेले उधारीचे पैसे
पैसे नाहीत म्हणून न दिलेली एखादी भेटवस्तू, वेळ नाही म्हणून न लिहिलेलं एखादं नाटक
हे सगळे भेटून माझ्या बद्दल काय बोलत असतील? कसा दिसत असेन मी त्यांना?
झगमगत्या प्रकाशानी उजळलेल्या रंगमंचावर हातात कुठलंसं पारितोषिक उंचावून दाखवताना?
प्रमोद
०३-०४-२०१९
No comments:
Post a Comment