Wednesday, 24 January 2018

कवीकल्पना


तिचं शरीर वर्णणारी माझी पौगंडावस्थेतली कविता जप्त झाली
फाडून टाकली गेली आणि मानली गेली माझ्या चारित्र्यावरचा काळा डाग
तिच्या स्तनाच्या उभारीवर मी वर्णलेल्या तिळासारखी

कुणी विचारलं कवितेचा प्रवास तिच्या शरीराच्या वर्णनातच संपला?
का पुढेसुद्धा पोहोचला? आणि माझा?

अचंबित मित्रांनी विचारलं कुठं भेटली अशी ती निर्वस्त्र, कुठल्या रेड लाईट मधे?
शोधत राहिले माझ्या प्रत्येक मैत्रिणीत, कवितेच्या पुढचा कौमार्यभंग

वर्णलेल्या तिच्या नितंबांच्या गोलाईसारखी फिरत राहिली ती खाजगी वाचनात
पण कवितांच्या मैफिलींमध्ये मला बोलावणं बंद झालं

असाच एका अंधाऱ्या गल्लीतून चालतांना कुणी ती आली समोर
दिसला नाही चेहेरा पण कवितेच्या बांध्यावरच घाटलेला तिचा बांधा

तिला निरखून पाहायचा प्रयत्न केल्यावर तिनं झाकले माझे डोळे
वाटलं झोपेविना कोरड्याखट्ट डोळ्यांवर जणू चंद्रच उतरला

तिनं टेकवले तिचे तप्त ओठ माझ्या ओठांवर आणि तसेच माझ्या कानांपर्यंत नेत म्हणाली,
'मला पाहिलंच आहेस तू निर्वस्त्र तर लाज कसली....... पण कवितेत विसरला आहेस लिहायचं कि स्तनाच्या उभारीवरचा तीळ नक्की कुठं आहे ते'
'उद्या गोंदवून घ्यायला जाणार आहे मी. आवडली मला तुझी ती कवीकल्पना !'


प्रमोद (३० डिसेंबर २०१७)

No comments:

Post a Comment