'अजाण हायस ग पोरी, तुले समजायचंय समदं'
'टाकलंस कशापायी चुलीत दुक्ख? वाटलं व्हय कि जळून जाईल'
बघ झाला न्हवं ह्यो समदा धूर झोपड्भर'
'इवलंस दुक्ख आता आभाळभर झालं, न्हवं'
'रडवीत ऱ्हायील आता तुले दिसभर'
'आन सायंच्याला, बनलेली राख ताटलीत भरून टाकायला जाताना'
'नेमकि येईल हवा, आनी त्ये इवलंस दुक्ख जमीनभर होईल'
'पायाले लागून समदीकडं होईल, अगदी हंथरुनात जाईल'
'मंग दिवसासारख्या रात्रीबी ओल्या'
सांगितलं व्हतं तुला, ओलं दुक्ख जळत न्हाई'
त्याले वाळू द्यावं लागतं
टाकून द्यायाचं आयुष्याच्या उन्हात, चांगलं वाळू द्यायचं
छान रचून ठीवायची वाळलेली दुक्ख
मंग त्या दुक्खाला टाकायचं चुलीत, झकास भाकर थापायची
आणि एक्ल्यानं बसून खायची.
व्हतो थोडा धूर तवाबी, वहायची थोडी टिपूसं त्या दुक्खाचं देनं म्हणून.......
पोरी, हिकडं ये. ये गो माय. पूस डोळं.
पोरी, ह्ये समदं सांगायलाच तर आय अस्ते न्हवं.
उगी उगी रडू नकोस...... पर एक लक्षात ठिव
ओलं दुक्ख जळत न्हाई, ठार वाळू द्यावं त्याले
आणि इश्वास ठिव माजेवर,
केवढं भी आभाळभर दुक्ख असीनाका, त्ये वाळतच.
जगत रहावं माय, जगत रहावं
प्रमोद
२८ मार्च २०१८
No comments:
Post a Comment