कुणी आपल्या कामाचा भाग म्हणून
समोरच्या कस्टमरला म्हणतं,"सर, मोठा टब घेतला
तर फ्री रिफील आहे"
मग तो कोणी मोठा टब घेतो
आरामात रेलून
AC ऑडिटोरियम मध्ये बसून
कर्रर्रम-कर्रर्रम पॉप कॉर्न
खात राहतो
समोर सावरकर अंदमानातल्या
एकांतवासात झगडत राहतात
स्वतःच्या शरीराशी, मनाशी
कोण्या बेरीशी,
संपूर्ण इंग्लिश साम्राज्याशी
तो पॉप कॉर्न खाणारा माणूस
काय म्हणून पाहात असेल
सावरकरांना?
माझी मुलगी बघते
शेव चुरमुरे खात कार्टून,
छोटा भीम! जो लड्डू खाऊन
समोरच्या लोकांना ठोसे लगावतो
तश्याच एखाद्या काल्पनिक पात्राप्रमाणे?
खोट्या खोट्या?
तो कर्रर्रम-कर्रर्रम आवाज
त्रास देत राहतो सारखा
राग येतो, वाटतं उचलून फेकून द्यावा तो टब
समोरचा होणारा त्यांचा छळ सहन ना झाल्याने
मी मिटतो डोळे एक क्षण
सावरकर प्रकटतात अंधारात,
माझ्या डोळ्यात तीक्ष्णपणे बघत म्हणतात,
त्याच्यावर चिडण्याचा काय अधिकार आहे तुला?
तू काय करतो आहेस?
किती भर घालतो आहेस मिळालेल्या स्वातंत्र्यात?
मी नुसतीच मान खाली घालून
निघून जातो त्यांच्यासमोरून
पॉप कॉर्नचा आवाज कानात वाजत राहतो
कर्रर्रम-कर्रर्रम
पॉप कॉर्नचा आवाज कानात वाजत राहतो
कर्रर्रम-कर्रर्रम
No comments:
Post a Comment