माझ्या हळव्या मनाचा राग येतो मला
माझ्या मानेचा लचका तोडू पाहणाऱ्या
हिंस्त्र श्वापदाला संपवलंय मी नुकतंच
त्याचं निरागस शरीर पडलंय समोर
रक्ताच्या थारोळ्यात
माश्या घोंगावतायेत,
लाळ गळतीये तोंडातून अजून
पण मग प्रचंड अपराधी वाटायला लागलंय
आत खोल निराशा दाटून आली आहे
सारखं वाटतंय, मारलं नसतं तर?
नुसतंच जखमी केलं असतं तर?
त्याच्या जवळ जाऊन
त्याची माफी मागावी वाटते आहे
मी जवळ जातो
अन अचानक खुनशीपणाने
पुन्हा ते श्वापद चालून येतं
तेच अणकुचीदार दात,
तीच घशातली कर्कश्श घरघर
तोच राक्षसी आवेश
दात ओठ खात
खुपसतो सुरा त्याच्या पोटात
अगदी ठार मेलंय ह्याची खात्री करतो
धपापणारे श्वास थोडे
काबूत आल्यावर
पुन्हा,
पुन्हा ते दिसायला लागतं
निरागस बिचारं
माझ्या
हळव्या मनाला
प्रमोद
१३ मार्च २०२४
१३ मार्च २०२४
No comments:
Post a Comment