माझ्या कविता विचारांच्या आणि बांधणीच्या दृष्टीने अतिशय स्वैर असतात, त्याला एका धाग्यात कसं गुंफायचं हा फार मोठ्ठा प्रश्न आहे. त्याच बरोबर माझं आयुष्य काही चांगुलपणाच्या साच्यात बांधलं गेलं आहे. संस्कार म्हणा, आजूबाजूचं वातावरण म्हणा, भेटलेल्या माणसां-मित्रां मुळं म्हणा किंवा एका साळसूदपणाच्या भित्रेपणामुळं म्हणा, पण विचारात कुठेही हिंसेचा उद्रेक नाही, चेतवेल असा शृंगार नाही आणि जहाल वाटेल असा निर्णायक हेका सुद्धा नाही, …. म्हणून संयत.
Wednesday, 14 July 2021
वाहणं
घरासमोरच्या ओढ्यात
सोडून दिलेली नाव
पत्र बनून परत आली
तरंगण्याचा आनंद, वेगाचा उन्माद
आकस्मित हेलकावे, बुडण्याची भीती
सगळ्यांच्या नोंदी होत्या त्या पत्रात
ओलसर होता कागद जरासा
वाळायला टेबलावर ठेवला
तर तो
पुन्हा नाव बनून गेलाय
पुन्हा पाऊस पडतोय
पुन्हा ओढा वाहतोय
आणि मी?
मी तसाच आहे स्थिर
वाहून जाणाऱ्या नावेकडं पाहत
मला पडलाय प्रश्न
माझ्या वाहण्याचं काय?
प्रमोद
१४ जुलै, २०२१
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment