Wednesday, 28 October 2020

Uninstall


टीव्ही बंद करावा तसा
कवी बंद करता येतो ! .......

नुकत्याच झालेल्या प्रयोगावरून झालंय सिद्ध

अगदी बंद नसेना का,
ऐरोप्लेन किंवा सायलेंट मोडवर तरी
नक्कीच टाकता येतो

अंत्ययात्रा, वरात
श्रावण, ग्रीष्म
सगळे ऋतू,
पाऊस, प्रेयसी,
खून आत्महत्या
ह्यांचे काव्यात्मक परिणाम
रोखणारा एखादा
अँटी इमोशन प्रोग्रॅम सुद्धा
डाउनलोड होत असेल
एखाद्या AI प्रणालीच्या मदतीने
.....परस्पर


फार काही बिघडलं नाहीये
कविपण जास्तच मेमरी खातं उगाच

म्हणजे काळ्या पांढऱ्या बायनरी
कवितांच्या कचऱ्याचा
उपयोग तसा विशेष नाहीच
कुणालाच तसं काही देणं घेणं नाहीये

उलट शांत वाटतंय

कसलेच नोटिफिकेशन नाहीत

अनइंस्टॉल करायचं बटन दाबलं
तर साधं विचारलं सुद्धा नाही
'Are you sure'


प्रमोद
27 ऑक्टोबर 2020

माझ्या कवितांना तोंड भरून दाद देणाऱ्याने
कॅंडी क्रशचं invite पाठवलंय
एका सांत्वनपर कवितेसोबत

No comments:

Post a Comment