Thursday, 23 July 2020

द्वाड


संपतच नाहीत भास
कुणीतरी माझ्या पुढे, मागे
चालत असल्याचे
सतत

एका विशाल पिंपळाच्या
थंड छायेखाली
विश्रांती घेत असताना

माझ्यातलं
ईश्वरी काही
माझ्याकडं प्रेमानं बघत

म्हणालं
पारंब्यांवर
फिरणाऱ्या
मुंगीला

कितीदा सांगितलं ह्याला
जे आहे ते इथंय
पायाला टेकणाऱ्या
मातीच्या कणांत
शरीराला घासणाऱ्या
वाऱ्याच्या स्पर्शात
खळाळणाऱ्या
पाण्याच्या घोषात
तळपणाऱ्या
सूर्याच्या प्रकाशात

आणि हा
द्वाडपणे
धावत सुटतो
मागे पुढे

माझा
हात सोडून

प्रमोद
२३-०७-२०२०

No comments:

Post a Comment