Monday, 9 December 2019

भीती


कुणी बकाल हसत म्हणालं
रांड आहेस तू,
तुला कसली बलात्काराची भीती?'

आठवते मला केलेली मनाची तयारी,
रोज,
एखादा देवपूजा करतो रोज,
तशी रोज न चुकता केलेली,
तयारी,

एखाद्या योग्यासारखी,
अंगिकारलेली,
इंद्रियांना चामडं करायची प्रक्रिया
हळू हळू बंद केलेले
मनाचे हळवे कोपरे,
मग,

माझ्या शरीरावरची वस्त्रं निघतात
तेव्हा तिथे पडलेलं असतं
थंड लोखंड
लाजेच्या पल्याड पोहोचलेलं

गौरवास्पद नाहीच,
पण मला मिळतो,
अपरिहार्यतेच्या पुढंही
एक पर्याय
पुढं घडणारा संभोग
स्वतःबाहेर ठेवण्याचा

पण जेव्हा हा किमान पर्यायसुद्धा
नाकारला जाईल तेव्हा

मला बलात्काराची भीती वाटते

प्रमोद
०९ डिसेम्बर २०१९

No comments:

Post a Comment