Thursday, 19 December 2019

पार


माझा मेंदू
एक पार होता
ठेहेरावाचा स्थायीभाव असलेला

वर्दळीची आसक्ती न्हवती
तिथून जाण्याची घाई नाही
ना थांबण्याची सक्ती

तिथं,
काही वर्षानुवर्षे पडून असायचं
काही वाऱ्यासारखं प्रवाही

मी न्हवतो,
कुठल्याच नकाशांवर
मुशाफिरांच्या यादीत

माझं नसणं
कमीपणाचं न्हवतं
माझ्यासाठी

मग मीच कधीतरी
बांधली अजून एक वाट,
अगदीच निर्हेतूकपणे... कदाचित
माझ्यातून निघणारी.

मग माझा चौक झाला

वर्दळ वाढली
गोंगाट वाढला

आता येणाऱ्या जाणाऱ्यांशी
होत नाहीत गप्पा
मंथन
आलेला पुढं जावाच लागतो
नाहीतर लगेच ट्रॅफिक जाम

फास्टटॅग लावलेत आता
काहीच थांबत नाही

वैतागून फोडायला उठतो
टोलनाके
पण शेवटी मोजत राहतो
गल्ला
अगम्य संपत्तीने भरलेला
जी वापरता येत नाही
कुठल्याच व्यवहारात


प्रमोद
१९ डिसेंबर २०१९

No comments:

Post a Comment