Monday, 16 September 2019

पाऊस!


मागचे तीन चार दिवस पाऊस लागल्यानं सगळं गाव थिजलेलं होतं. नदीला पाणी आल्यानं मुलांना सुट्ट्या मिळाल्या होत्या.गावाच्या वेशीजवळच्या पिंपळाच्या खाली तो कुठलासा बैरागी येऊन बसला होता. उघडं अंग आणि कमरेला पंचा गुंडाळलेला. पानांतून पाझरणाऱ्या पावसाच्या थेंबात भिजत तो पद्मासनात बसला होता. त्यानं त्याचा मातीचा वाडगा समोरच्या पावसात ठेवला होता. भरून तो ओसंडून वाहात होता. वाडगं उचलून पाणी प्यावं असा विचार करत असतानाच अंधुक पावसात त्याला बऱ्याच माणसांच्या आकृती त्याच्या बाजूला चालत येतांना दिसल्या. थोड्या वेळाने त्या सगळ्या व्यक्ती त्याच्या जवळ आल्याने त्याला स्पष्ट दिसायला लागल्या. गावातली आठ दहा माणसं आणि त्यांच्या मागं तेव्हढीच मुलं एका तरुणाला ढकलत ढकलत वेशीकडं घेऊन येत होती. तो माणूस पूर्ण नग्न होता. मागच्या लोकांशी आपलं काहीच देणं घेणं नाही अश्याप्रकारे आकाशाकडं बघत तो चालत होता. मधेच रेंगाळला कि मागची लोकं त्याला काठीने पुढे ढकलायची आणि तो पुन्हा चालायला लागायचा. त्या माणसाचे केस अस्त्याव्यस्त वाढलेले होते. गोणपाट पांघरलेली काही मुलं त्याला दगडं सुद्धा मारत होती. वेशीपाशी आल्यावर लोक थांबले. त्यातला एक माणूस पुढं येऊन म्हणाला,
'ए चल निघ. पुन्हा येऊ नकोस इकडं.... च्यामायला ह्याला नाही लाज..... बायकांना दिवसाढवळ्या घरातून बाहेर पडायची चोरी..... ' तो माणूस तसाच थांबला. पुन्हा त्यानं त्याच्या काठीनं त्याला जोरकस ढकललं आणि तो विव्हळत एकदम पुढे गेला आणि त्याच्या पायाला ठेच लागली. तो विव्हळत लहान मुलासारखा रडू लागला. सगळी लोकं निघून गेली आणि त्यातला एक माणूस तिथल्याच एका घराच्या पडवीत बसून राहिला.
 'परत यायला लागला तर डोकं फोड त्याचं' त्यांचा पुढारी जाताना म्हणाला. तो पावसात तसाच रडत बसून राहिला होता. 
तो बैरागी त्याच्या जवळ गेला. हळूच त्याच्या खांद्यावर हात ठेऊन त्याला उठवत झाडाच्या आडोश्याला घेऊन आला. त्या तरुणाची बैराग्याला खूप कीव वाटली. त्याच्या पायाच्या अंगठ्यातून रक्त भळाभळा वाहात होतं. बैराग्यानं त्याच्या पंचाचं चिरगुट फाडलं. शेजारच्या गावतातुन कुठलासा पाला आणून तो चाऊन त्याचा चोथा केला आणि त्याच्या जखमेवर लाऊन त्यावर ते चिरगुट बांधलं. वेदनेनं तो कळवळला. बैराग्यानं त्याच्या वाडग्यातलं पाणी त्याला पिऊ घातलं आणि विचारलं, 
'काय झालं बाळा तुला?'
'म ... माझा पाऊस हरवलाय....' 
'अं ?'
'माझा माझा पाऊस हरवलाय!'
त्या बैराग्याच्या डोळ्यात एकदम पाणी तरारलं. त्याला कळेना ह्या मुसळधार पावसात ज्याचा पाऊस हरवला आहे त्याची कशी मदत करावी. बैराग्याच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब ओघळून त्या तरुणाच्या हातावर पडले. त्या तरुणानं चमकून त्याच्याकडं बघितलं. बैराग्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या डोळ्यातल्या पाण्याकडं तो कितीतरी वेळ तो लहान मुलाच्या कुतूहलानं बघत होता. मग त्या बैराग्याच्या मिठीत शिरून तो कितीतरी वेळ नुसताच पडून राहिला. पाऊस थोडा उघडला होता. त्या तरुणाला झोप लागून गेली. आणि पुन्हा पावसाची एक जोरदार सर आली. तो तरुण अचानक उठला. लंगडणाऱ्या पायानं पावसात जात तो ओरडायला लागला.

 'बाबा, ए बाबा, अरे पाऊस पडतोय ..... पाऊस!'

प्रमोद १६ सप्टेंबर २०१९

No comments:

Post a Comment